शिवराजसिंह चौहान यांनी लाडकी बहीण योजना आणली अन् मुख्यमंत्रीपद गेलं, एकनाथ शिंदे यांना माहीत आहे काय?; जयंत पाटील यांच्या सवालाने सभागृहात खसखस

| Updated on: Jul 02, 2024 | 6:43 PM

"मागच्या काळात शिवराजसिंह चौहान यांनी लाडली बहीण योजना राबवली होती. त्या राज्यात ही योजना बरीच लोकप्रिय झाली. शिवराजसिंह चौहान यांना परत मुख्यमंत्री होता आलं नाही. एकनाथ शिंदे यांना हे माहिती आहे की नाही, ते मला माहिती नाही", असा टोला जयंत पाटील यांनी सभागृहात लगावला.

शिवराजसिंह चौहान यांनी लाडकी बहीण योजना आणली अन् मुख्यमंत्रीपद गेलं, एकनाथ शिंदे यांना माहीत आहे काय?; जयंत पाटील यांच्या सवालाने सभागृहात खसखस
जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आज विधानसभेच्या सभागृहात जोरदार फटकेबाजी केली. जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलेच टोले लगावले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची घोषणा केली. याच घोषणेवरुन जयंत पाटील यांनी टोले लगावले. “अजित दादांच्या मुखात तुकाराम महाराज आले. लोकसभेचा परिणाम दिसत आहे”, असा टोला जयंत पाटील यांनी सुरुवातीला लगावला. “राज्यात पाणी वाया चाललं आहे. पाणी बद्दल बोलायला नको? आपण मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं. इंद्रायणी आणि चंद्रभागा नदीची स्थिती वाईट झाली आहे. वारीचा आत्मा नद्या आहेत. यासाठी बजेटमध्ये काहीच केलं नाही. नद्यांच्या स्वच्छतासाठी घोषणा करावी”, अशी मागणी जयंत पाटील यांनी यावेळी केली.

“भाजपने जाहीरनाम्या काय म्हटलं होतं ते बघा. पाच वर्षात दुष्काळमुक्त महाराष्ट्र करणार, एक कोटी रोजगार निर्माण करणार, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देणार”, असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपचा मागील विधानसभेचा जाहीरनामा वाचून दाखवला. “अजित दादा हा भाजपचा जाहीरनामा आहे. तुम्ही-आम्ही तेव्हा सोबत होतो. भाजपने घोषणा केली. पण ते जनतेला काही दिलं नाही, म्हणून जनता यांना विचारत नाही”, असं जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील यांच्या सवालाने सभागृहात खसखस

“अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण ही नवी योजना जाहीर केली आहे. या योजनेची अंमलबजावणी कशी होणार ते कळेलच. आता तुम्हीच सांगितलं की, महिलांची तहसील कार्यालय परिसरात गर्दी फार उसळलेली आहे. त्यामुळे त्या सगळ्या बहि‍णींना संपत्तीतला योग्य वाटा मिळायला हवा. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातला 50 टक्के वाटा महिलांना मिळायला पाहिजे. आपल्या बघिणींचा तो अधिकार आहे. त्यामुळे तो वाटा दिला म्हणून काही बिघडत नाही. दिलंच पाहिजे”, असं जयंत पाटील म्हणाले.

“आमच्या महाराष्ट्रातल्या बघिणींचा जसा घरावर, संपत्तीवर 50 टक्के वाटा आहे, अगदी वारसा हक्क लावताना सुद्धा बहिणीचं एनओसी नाही आली तर तिला तेवढा हक्क जातो. तसं या बजेटमध्ये बहि‍णींचा अधिकार आहे. यातील 50 टक्के बहि‍णींना त्यांचा वाटा देण्याची काळजी आपण घेतली पाहिजे. मागच्या काळात शिवराजसिंह चौहान यांनी लाडली बहीण योजना राबवली होती. त्या राज्यात ही योजना बरीच लोकप्रिय झाली. शिवराजसिंह चौहान यांना परत मुख्यमंत्री होता आलं नाही. एकनाथ शिंदे यांना हे माहिती आहे की नाही, ते मला माहिती नाही. त्यांनी स्वत: ती योजना मांडली नाही. त्यांनी मांडायला लावली अजित पवार यांना”, अशी टोलेबाजी जयंत पाटील यांनी केली.

‘त्यावेळी अजितदादा अर्थमंत्री होते’

“उज्ज्वला योजना केंद्र सरकारने आणली होती. उज्ज्वला योजना सगळ्यांकडे पोहोचल्यावर 400 रुपयांचा घरगुती गॅस सिलेंडर 1200 रुपये केले. अजित दादांनी केवळ तीनच सिलेंडर माफ केले. आमचं सरकार आल्यावर महाराष्ट्रात सिलेंडरची किंमत महाराष्ट्रात 500 रुपये करु. 500 रुपयांपेक्षा जास्त रुपये घेणार नाही”, असं जयंत पाटील म्हणाले.

“गॅस सिलेंडरबाबत योग्य योजना आखायला हवी होती”, असं जयंत पाटील म्हणाले. यावेळी आमदार मनीषा चौधरी म्हणाल्या, “तुमचं सरकार होतं तेव्हा का राबवली नाही?”, त्यावर जयंत पाटील म्हणाले, “तेव्हा अजित दादाच अर्थमंत्री होते.” यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.