मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडे जाणाऱ्या आमदारांचा ओघ काही कमी होताना दिसत नाहीय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात थेट समोरासमोर आले आहेत. या परिस्थितीत अनेक आमदारांनी अजित पवार यांच्यासोबत जाणं पसंत केलं आहे. तर काही मोजक्या आमदारांनी शरद पवार यांना साथ देण्याचं आश्वासन दिलं आहे. पण यापैकी काही आमदार आता अजित पवार यांच्या भेटीगाठी घेत असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांच्या ज्या आमदारांवर विश्वास होता ते आमदारही आता अजित पवार यांची भेट घेत असल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर एकाच दिवशी शरद पवार आणि अजित पवार यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आमदारांची बैठक बोलावली होती. यावेळी शरद पवार यांच्या बैठकीला 16 आमदारांनी उपस्थिती लावली होती. तर अजित पवार यांच्या बैठकीला 32 आमदारांनी उपस्थिती लावली होती. पण त्यानंतर शरद पवार यांच्या बैठकीला हजेरी लावणारे नेते अजित पवार यांच्या गोटात जाऊ लागले आहेत.
शरद पवार यांची बैठक पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. राजेश टोपे यांच्यासोबत आमदार सुनील भुसारा हे देखील होते. अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ या निवासस्थानी जावून या नेत्यांनी त्यांची भेट घेतली. या आमदारांमध्ये कालपर्यंत देवेंद्र भुयार आणि चेतन तुपे यांचंदेखील नाव होतं. त्यानंतर आज आणखी एक नव्या आमदारांचं नाव समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी आज अजित पवारांची भेट घेतली आहे. मकरंद पाटील यांनी यापूर्वी शरद पवार यांना समर्थन दर्शवलं होतं. शरद पवारांच्या सातारा दौऱ्यावेळी देखील मकरंद पाटील त्यांच्यासोबत होते. पण त्यांनी आज अजित पवारांची भेट घेतली आहे.
एकीकडे आमदार अजित पवार यांच्या भेटीगाठी घेत आहेत तर दुसरीकडे शरद पवार हे देखील कामाला लागले आहेत. शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघाचा दौरा केला. हा मतदारसंघ मंत्री छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला मानला जातो. पण भुजबळांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार यांनी आपली तोफ डागली. यावेळी त्यांनी वयाच्या मुद्द्यावरुन अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही उत्तर दिलं.