मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलगी खासदार सुप्रिया यांच्यावर टीका करताना अतिशय गलिच्छ वक्तव्य केलं. त्यांच्या टीकेनंतर राज्यभरातील राजकीय वातावरण तापलं आहे. सत्तारांच्या गलिच्छ टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. सत्तारांनी माफी मागावी, अशी मागणी केली जातेय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून अब्दुल सत्तार यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. या सगळ्या घडामोडींवर सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय.
सुप्रिया सुळे यांच्यावर अतिशय खालच्या दर्जाची टीका करण्यात आलीय. त्यामुळे या टीकेवर त्यांची काय प्रतिक्रिया येते याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. अखेर या प्रकरणी सुप्रिया यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय. खरंतर त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या विधानावर बोलणंच टाळलं आहे. “मी या प्रकरणावर बोलणार नाही. अब्दुल सत्तारांवर मी बोलणार नाही”, अशी पहिली प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.
सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मोठ्या नेत्या आहेत. महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर त्या लोकसभेत वाचा फोडण्याचं काम करतात. संसदेत अनेकदा त्या इंग्रजीत आपली भूमिका मांडताना दिसल्या आहेत.
सुप्रिया राज्यात प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. त्यांना एखादी मेहनती, चांगली व्यक्ती रस्त्याने जाताना सापडली तर त्या त्यांना प्रोत्साहन देतात. त्यांच्यासोबत फेसबुक लाईव्ह देखील करतात.
सुप्रिया सुळे यांच्यासारख्या दिग्गज खासदारावर अशाप्रकारची टीका होणं महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारं नाही, अशी भूमिका अनेक सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जातेय.
अब्दुल सत्तार नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडीओ
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या घराच्या काचा फोडल्या
अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. अनेक कार्यकर्ते सत्तांरांच्या मुंबईतील बंगल्याबाहेर दाखल झाले. त्यांनी तिथे आंदोलन केलं. यावेळी त्यांनी सत्तारांच्या बंगल्याच्या काचा फोडल्या. सत्तारांविरोधात घोषणाबाजी केली. या सर्व गदारोळामुळे परिसरातील तणावाचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान, पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांची धरपकड केली. पण सत्तारांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याशिवाय आपण इथून हटणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली.