मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत घेण्यासंदर्भात चर्चा सुरु असताना, या चर्चेला राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीत मोठा धक्का बसला आहे. मनसेला आघाडीत घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यांनी जोरदार विरोध केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे स्वत: मनसेला आघाडीत घेण्यासाठी आग्रही आहेत.
कालच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यानंतर अजित पवारांनी मनसेला आघाडीत घेण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. मात्र, आता राष्ट्रवादीच्याच मुंबईतील नेत्यांनी मनसेला आघाडीत घेण्यास विरोध केला आहे. मुंबईतील्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांची भूमिका अजित पवारांच्या कानावर घातल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
मनसे स्वतंत्रपणे निवडणुकीच्या मैदानात उतरली, तरी आघाडीला फायदाच होईल, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मांडली.
अजित पवारांच्या ‘राज’भेटीनंतर ‘कृष्णकुंज’वरील हालचाली वाढल्या!
मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीला अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते हजर आहेत.
काल राज ठाकरेंना भेटल्यानंतर अजित पवार काय म्हणाले?
“होय, मी राज ठाकरे यांना भेटलो. मोदीविरोधी सर्व पक्ष, नेते एकत्र यावेत, हे माझे मत आहे. अंतिम निर्णय दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी घ्यायचा आहे.”, असे म्हणत अजित पवार यांनी राज ठाकरे यांना आघाडीत घेण्यासंदर्भात सहमती दर्शवली. तसेच, “कधी काळी भाजपाचा पाठिंबा घेणाऱ्या मायावतीही आज मोदी विरोधात आहेत. भाजपसोबत असणारे चंद्राबाबू नायडू विरोधात आहेत.”, असे म्हणत अजित पवारांनी मनसेला आघाडीत घेण्यासाठी विरोध करणाऱ्यांनाही उत्तर दिले आहे.
VIDEO : शिवसेना, राष्ट्रवादी, मनसेच्या बैठका, महाराष्ट्रातील राजकारणाच्या वेगवान घडामोडी