राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन आरोपींनी गोळ्या झाडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सिद्दीकी यांना गोळीबारानंतर तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही त्यांचं निधन झालं. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर आज सकाळी त्यांचं पार्थिव मुंबई महापालिकेच्या कुपर हॉस्पिटल येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आलं होतं. त्यांच्या पार्थिवावर शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घरी मुंबईत नेण्यात आलं होतं. यानंतर राज्यातील अनेक दिग्गज नेते, बॉलिवूड कलाकार यांनी बाबा सिद्दीकी यांच्या घरी जावून त्यांचं अंत्यदर्शन घेतलं.
यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव घराबाहेर आणण्यात आलं. यावेळी नमाज ए जनाजाचं पठण करण्यात आलं. नमाज ए जनाजा अदा केल्यानंतर बाबा सिद्दीकी यांच्या अत्यंयात्रेला सुरुवात झाली. यावेळी मुंबई पोलिसांनी बाबा सिद्दीकी यांना सलामी दिली. बाबा सिद्दीकी यांच्या अंत्य दर्शनासाठी त्यांच्या हजारो समर्थकांनी प्रचंड गर्दी केली. बाबा सिद्दीकी यांच्या वांद्रे येथील राहत्या घराहून मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तान अशी बाबा सिद्दीकी यांची अंत्ययात्रा काढण्यात आली आहे. यावेळी प्रचंड पाऊसही पडतोय.
बाबा सिद्दीकी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आहेत. सिद्दीकी यांनी आपल्या वयाची जवळपास चार दशके काँग्रेससोबत काम केलं. त्यांनी काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. बाबा सिद्दीकी यांना अजातशत्रू मानलं जायचं. कारण त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत खूप चांगले संबंध होते. त्यामुळे अशा नेत्यावर गोळीबार होणं हे सहजासहज न पटणारे आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावरील गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आल्याची चर्चा आहे. पोलीस या प्रकरणी सखोल तपास करत आहेत.