जयंत पाटील यांचा टेंडरबाबत खळबळजनक दावा, सरकारवर गंभीर आरोप, Tv9 च्या कॉन्क्लेव्हमध्ये पाहा काय म्हणाले?

| Updated on: Sep 06, 2024 | 2:27 PM

"लोकसभेआधी सरकारने सहा प्रकल्प काढले. त्यात टेंडर काढले. ११ हजार कोटीचं काम १५ हजार कोटीला दिले. ठरावीक लोकांनाच टेंडर दिलं जातं. सात-आठ लोकांनाच टेंडर मिळेल, असा क्रायटेरिया ठरवला जातो. तेच पैसे निवडणुकीत वापरले जात आहेत", असा धक्कादायक दावा जयंत पाटील यांनी केला.

जयंत पाटील यांचा टेंडरबाबत खळबळजनक दावा, सरकारवर गंभीर आरोप, Tv9 च्या कॉन्क्लेव्हमध्ये पाहा काय म्हणाले?
जयंत पाटील
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी होत विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत जयंत पाटील यांनी खळबळजनक दावा केला. “लोकसभेआधी सरकारने सहा प्रकल्प काढले. त्यात टेंडर काढले. ११ हजार कोटीचं काम १५ हजार कोटीला दिले. ठरावीक लोकांनाच टेंडर दिलं जातं. सात-आठ लोकांनाच टेंडर मिळेल, असा क्रायटेरिया ठरवला जातो. तेच पैसे निवडणुकीत वापरले जात आहेत. पैशाने मते विकत घेतली जातात ही त्यांची मानसिकता आहे. लोकसभेत प्रचंड पैसा वापरला. कुठून आले हे पैसे?”, असा सवाल जयंत पाटील यांनी केला. तसेच “या सरकारची निर्मितीच ही भ्रष्ट मार्गाने झाली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्माते शरद पवार यांचा पक्ष यांनी फोडला”, असा घणाघात जयंत पाटील यांनी या मुलाखतीत केला.

“सिडकोची अवस्था बरी आहे. एमएमआरडी सरप्लसमध्ये होती. ती कर्जात आहे. म्हाडाही कर्जात आहे. माझ्यावेळी आपण एमएमआरडीए आणि म्हाडाकडून पैसे घ्यायचो. आता या संस्था विक झाल्या आहेत. सरकार आर्थिकदृष्ट्या मोठे प्रकल्प करूच शकत नाही. हे सरकार फक्त घोषणा करत आहेत. बेरोजगारी मोठा प्रश्न आहे. तरुण मुलं यांचं ऐकायला तयार नाही. महागाई वाढली आहे. सामान्य लोकांना यांचा विश्वास नाही. या सर्व अनुषंगाने सव्वा लाख कोटीच्या प्रकल्पाची घोषणा केली आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.

लाडकी बहीण योजनेची धडकी भरली?

विरोधकांना लाडकी बहीण योजनेची धडकी भरली, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. याबाबत जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “लाडकी बहीण योजनेची धडकी भरली नाही. अर्थसंकल्पात ही योजना नाही. शेजारून कागद आला आणि ही योजना आली. विचार न करता ही योजना आणली आहे. आमचं सरकार आलं तर त्यापेक्षा चांगली योजना करू. महिलांच्या केसाला धक्का लागणार नाही, महाराष्ट्रातील महिलांकडे पाहण्याचं धाडस कुणाचं होणार नाही अशी व्यवस्था आम्ही असं करू”, असं जयंत पाटील म्हणाले.

“आज जे पैसे दिले जात आहेत, त्यातही आम्ही सुधारणा करू. या योजनेमुळे सर्व योजना बंद झाल्या आहेत. सर्व योजनांचे पैसे डायव्हर्ट होत आहे. पोलिसांचे पगार बंद होतील, डीले होतील. राज्याची अवस्था प्रचंड घोटाळ्याची होणार आहे. आर्थिक अवस्था अडचणीची होणार आहे. ८ लाख कोटी पेक्षा जास्त कर्ज आहे”, असा दावा जयंत पाटील यांनी केला.