दिनेश दुखंडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 30 सप्टेंबर 2023 : अजित पवार गट आणि शरद पवार गटातील वर्चस्वाची लढाई आता दिवसे न् दिवस वाढताना दिसत आहे. दोन्ही गटाने पक्ष आणि पक्ष चिन्हावर दावा सांगितला आहे. त्यासाठी दोन्ही गट निवडणूक आयोगात गेले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग आता कुणाच्या बाजूने कौल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर, दुसरीकडे शरद पवार गटाने आता अजित पवार यांनाच अडचणीत आणण्याचं काम सुरू केलं आहे. त्यावर आता अजितदादा काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अजित पवार यांनी ठाकरे आणि शिंदे गटाच्या वादावर एक विधान केलं होतं. यावेळी त्यांनी पक्ष आणि चिन्हाच्या मुद्द्यावरून आपलं मत मांडलं होतं. चिन्ह आणि पक्ष एकनाथ शिंदे यांना देण्याबाबतची भूमिका त्यांनी मांडली होती. अजितदादा यांचंच हेच वक्तव्य आता त्यांच्या अंगलट येणार असल्याची शक्यता आहे. कारण शरद पवार गट निवडणूक आयोगाकडे अजित पवार यांच्या या वक्तव्याविरोधात तक्रार दाखल करणार आहे. त्यामुळे अजित पवार अडचणीत येण्याची शक्यता आहे. अजित पवार यांची इतर पक्षाबाबतची भूमिका आणि आताची भूमिका यातील फरकही आयोगाच्या लक्षात आणून दिलं जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मला सांगा, ते म्हणतात की, बाबा 40 आमदार आणि काही खासदार एका बाजूला गेले म्हणून तिकडे आम्ही पक्ष आणि चिन्ह दिलं. मग एखाद्या पक्षाचे एक किंवा दोन आमदार असतील. ते एका बाजूने गेले… आता मनसेचं उदाहरण घ्या. मनसेचा एक आमदार आहे. तो म्हणाला इंजिनही माझं, पक्षही माझा तर मग तुम्ही तसाच निर्णय देणार का?, असं विधान अजित पवार यांनी केलं होतं.
दरम्यान, शरद पवार गट आणि अजितदादा गटाने राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्षावर दावा केला आहे. दोन्ही पक्षांनी निवडणूक आयोगात हा दावा केला आहे. येत्या 6 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाकडे त्यावर सुनावणी सुरू होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भाजप निवडणूक आयोग खिशात घालून फिरत आहे. त्यामुळे जो पक्ष भाजपकडे जातो त्यांना चिन्ह मिळतं. उद्या दोन लोकंही गेले अन् त्यांनी पक्ष आणि चिन्हावर दावा केल्यास त्यांना निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह दिल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आम्हालाच पक्षाचं चिन्ह मिळणार असल्याचा दावा केला आहे. आमच्याकडे बहुमत आहे. संख्याबळ आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आम्हाला न्याय देईल अशी आशा आहे, असं भुजबळ म्हणाले.