मुंबई | 22 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांना शह काटशह देण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन्ही गटाकडून आपलीच राष्ट्रवादी खरी असल्याचं सांगितलं जात आहे. बरं दोन्ही गटाचे नेते एकमेकांना भेटत आहेत. एकत्र चहापाणीही घेत आहेत. आणि नंतर पक्षावर दावाही सांगत आहेत. त्यामुळे सर्वचजण बुचकळ्यात पडले आहेत. राष्ट्रवादीत नेमकं काय चाललंय हेच कळायला मार्ग नाहीये. सर्वच संभ्रमाची स्थिती असताना आता आणखी एक बातमी येऊन धडकली आहे. राष्ट्रवादीच्या पाच आमदारांविरोधात कार्यवाही सुरू होणार असल्याचं साांगितलं जात आहे.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर काही आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले. तर काही आमदार शरद पवार यांच्यासोबत राहिले. दोन्ही गटाने आपलाच पक्ष मूळ असल्याचा दावा केला आहे. आपल्याकडेच पक्षाची दावेदारी असल्याचंही म्हटलं आहे. त्यासाठी दोन्ही गटाने निवडणूक आयोगात धावही घेतली आहे. तर अजित पवार गटाच्या विधान परिषदेतीला पाच आमदारांवर कारवाई करण्यासाठी शरद पवार गटाने विधानस परिषदेच्या उपसभापतींकडे धाव घेतली आहे. त्यामुळे या आमदारांच्या पात्र-अपात्रतेवर लवकरच कार्यवाही सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजितदादा गटाचे विधान परिषदेतील आमदार सतीश चव्हाण, अमोल मिटकरी, विक्रम काळे आणि अनिकेत तटकरे यांच्याविरोधात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे तक्रार केली होती. तर जितेंद्र आव्हाड यांनी विधान परिषदेचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. या आमदारांनी बाजू मांडावी म्हणून त्यांना नीलम गोऱ्हे यांच्याकडून पुढील आठवड्यात त्यांना नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे हे सर्वच्या सर्व पाचही आमदार अजितदादा गटाचे आहेत.
सुनावणीवेळी शरद पवार गटाकडून काय युक्तिवाद केला जातो आणि अजितदादा गटाचे हे पाचही आमदार काय युक्तिवाद करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शरद पवार गटाकडून आपलाच पक्ष मूळ असल्याचं सांगितलं जाण्याची शक्यता आहे. आमच्या पक्षात फूट पडलेली नाही. आमचा पक्ष मूळ आहे. शरद पवार हे आमचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे पक्षाध्यक्षांच्या आदेशावरून या पाचही आमदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शरद पवार गटाकडून केली जाण्याची शक्यता आहे.