सुनिल जाधव, कल्याण, दि. 25 नोव्हेंबर 2023 | मुंबईप्रमाणे आता ठाणे जिल्ह्यात विविध विकास कामे सुरु झाली आहेत. कल्याणमध्ये ७०० कोटी रुपये खर्च करुन नवीन उन्नत मार्ग करण्यात येणार आहे. फक्त अडीच किलोमीटरच्या हा मार्ग आहे. या मार्गामुळे ४० मिनिटांचा प्रवास चार मिनिटांत होणार आहे. शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या संदर्भाची माहिती दिली. तसेच कल्याणमध्ये मेट्रो सुरु होणार आहे. या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. यासंदर्भातील टेंडर सोमवारी निघण्याची शक्यता आहे. मेट्रो, रेल्वे आणि रस्ते अशा तीन पद्धतीने कल्याण लोकसभेत काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
विठ्ठलवाडीतून जाणाऱ्या जुन्या पुणे लिंक रस्त्यावरून कल्याण शहराच्या पश्चिमेला कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी कल्याण आणि उल्हासनगर शहराला मोठा वळसा घालून जावे लागते. मात्र आता जुन्या पुणे लिंक रस्त्यावरून थेट कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी उन्नत मार्गाची उभारणी केली जाणार आहे. यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळकडून (एमएमआरडीए) सर्व्हे करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकल्पासाठी आतापर्यंत ७० टक्के जागा संपादीत करण्यात आली आहे. तसेच या उन्नत मार्गासाठी ७०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या उन्नत मार्गामुळे ४० मिनिटांचा प्रवास हा ४ मिनिटांचा होणार आहे. त्यामुळे शहरात जाणारी वाहतूक परस्पर वळवली जाणार आहे.
कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांना या उन्नत मार्गाचा मोठा फायदा होणार आहे. शिवाय लवकरच या कामाची निविदा जाहीर केली जाणार आहे. येत्या दीड वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. शहाडपासून कल्याणपर्यंत येण्यासाठी सध्या ४० मिनिटे लागतात. परंतु हा मार्ग पूर्ण झाल्यावर चार मिनिटांचा हा प्रवास असणार आहे.
कल्याणमध्ये मेट्रो सुरु आहे. मेट्रो १२ चा डीपीआर मंजूर झाला आहे. सुमारे साडेपाच हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. एकूण २० किलोमीटरचा हा मार्ग असणार आहे. या मार्गासाठी चार शहरे एकमेकांना जोडले जाणार आहे. कल्याण, भिवंडी, ठाणे, नवी मुंबई, मुंबईसाठी नवीन मार्ग मिळणार आहे. मुंबई आणि कल्याणला जोडणारा मिसिंग लिंक सुरु होणार आहे.