मुंबई : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलं आहे. नितेश राणे यांनी या पत्रातून भगवदगीतेचं पठण करण्याचा मुद्दा मांडला आहे. भगवदगीतेच्या पठणाला होणारा विरोध दुर्दैवी आहे. आपल्या शाळांमध्ये भगवदगीतेचे पठण होणार नसेल तर ‘फ़तवा-ए-आलमगीरी’ पठण करायचं का? असा सवाल राणे यांनी केला आहे. मुंबई महापालिकेत भाजपच्या योगिताताई कोळी यांनी भगवदगीतेचं (Bhagwat Geeta) पठण व्हावं असा प्रस्ताव मांडला. समाजवादी पक्षानं त्या प्रस्तावाला विरोध केला. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपूत्र म्हणून तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो, असं नितेश राणे म्हणाले आहेत. प्रस्तावाला मान्यता देण्याचे आदेश तुम्ही द्यावेत, असं नितेश राणे म्हणाले आहेत. नितेश राणे यांच्या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय प्रतिसाद देतात हे पाहावं लागणार आहे. नितेश राणे यांनी याविषयी एक व्हिडीओ देखील ट्विट केला आहे. त्या ते भारताचा उल्लेख हिंदू राष्ट्र असा करताना दिसत आहेत.
@CMOMaharashtra @BJP4Mumbai pic.twitter.com/tBJVGKeg5E
— nitesh rane (@NiteshNRane) February 20, 2022
मा. श्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख.
महोदय,
महानगर पालिकेच्या शाळेत भगवद् गीता पठणाच्या ठरावाची सुचना महापौरांना भारतीय जनता पक्षाच्या योगिताताई कोळी यांनी केली. परंतू त्यावर लगेच समाजवादी पार्टी कडुन आक्षेप व विरोध घेतला जातोय खरंतर हे दुर्दैवी व दुख:द आहे.
ज्याप्रमाणे भारतीय संस्कृतीतील योग ज्ञान जगाने स्वीकारले, अंगीकारले त्यात कोणत्याही धर्माचा अडसर नाही. त्याचप्रमाणे जगभरातील विद्यापीठे, तत्ववेत्ते आणि विचारवंत तत्वज्ञानाच्या अभ्यासात भगवद् गीता या ग्रंथाला अन्यन साधारण महत्व देतात. अमेरिकेतील सेटॉन हॉल युनिव्हर्सिटीत तर भगवद् गीता आणि मॅनेजमेंट अशा पद्धतीचे कोर्सेसही शिकवले जात आहेत. संपूर्ण जग तत्वज्ञान ते कॉरपोरेट अशा सर्वच क्षेत्रात भगवद् गीतेच महत्व मान्य करत आहे. कारण हा ग्रंथ मानवी कल्याणाचा मार्ग सांगतो.
भगवद् गीता पठण विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासात महत्वाची भूमिका पार पाडेल, यात कुठलीही शंका असण्याचं कारण नाही. परंतू आपल्याच देशात जर गीता पठणला विरोध होत असेल तर मग विद्यार्थ्यांना औरंजेबाचे ‘फ़तवा-ए-आलमगीरी’ चे पठण करायला लावायचे का? जेणेकरून मुख्तार अन्सारी सारखे माणसं यांना घरोघरी जन्माला घालता येतील?
मला खात्री आहे की स्व. हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र म्हणून अशा भगवद् गीता पठणाला होणाऱ्या विरोधाच्या दबावापुढे आपण झुकणार नाहीत आणि योगिताताई कोळींची सुचना मान्य करण्यास आपण पक्षप्रमुख म्हणून लगेचच निर्देशीत कराल ही आशा बाळगतो.
जय जिजाऊ, जय शिवराय.
महाजनांच्या बैठकीवरून नाथाभाऊंचा तिळपापड; भाजप भुईसपाट होत चालल्याचे साधले शरसंधान