मुंबई: केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी हे आज भोवळ येऊन स्टेजवरच कोसळले. शिर्डीजवळच्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभादरम्यान, गडकरींना भोवळ आली. सध्या गडकरींची प्रकृती ठणठणीत आहे. प्रवास आणि व्यस्त कार्यक्रमामुळे गडकरींना भोवळ आल्याचं सांगण्यात येत आहे. गडकरी हे या कार्यक्रमानंतर शिर्डीत साईंच्या दर्शनाला पोहोचले, त्यानंतर ते नागपूरकडे रवाना झाले. प्रकृती अस्वास्थानंतर त्यांचे पुढील तीन दिवसांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
दरम्यान गडकरींनीही आपली प्रकृती उत्तम असल्याचं ट्विट करुन सांगितलं. “शुगर कमी झाल्याने चक्कर आली, आत्ता तब्बेत बरी आहे. डॉक्टरांनी तपासणी केली आहे. माझ्या हिंतचिंतकांचे मी आभार मानतो” असं ट्विट नितीन गडकरी यांनी केले.
गडकरींच्या काळजीपोटी दिग्गजांचे ट्विट
दरम्यान, नितीन गडकरी भोवळ येऊन कोसळल्याचं समजताच, देशभरातील दिग्गज नेत्यांनी त्यांच्या काळजीपोटी ट्विट करत, त्यांच्या उत्तम प्रकृतीची कामना केली.
शरद पवारांकडून विचारपूस
माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गडकरींच्या प्रकृतीबाबत ट्विट करुन, उत्तम प्रकृतीचा कामना केली. पवार म्हणाले, “कधीकधी कठोर परिश्रमाचा, अतिरिक्त कामाचा आरोग्यावर परिणाम होतो. नितीन गडकरीजी कृपया काळजी घ्या. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा”
Sometimes hard work takes a toll on health! @nitin_gadkari ji please take care. I wish you a very good health!!
— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 7, 2018
काँग्रेस नेते विजय दर्डा
“नितीन गडकरजींशी फक्त बोललो. ईश्वराचे आभार, ते ठीक आहेत. त्यांनी घातलेल्या कपडयांमुळे त्यांना घुटमळत होते असे त्यांनी सांगितले. त्यांच्या शरिरातील साखर कमी झाली. काळजी करण्यासारखं काही नाही. त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो”
अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया
राजकीय, सामाजिक क्षेत्रात गडकरी काम करतात. आमचे राजकीय मतभेद असले तरी त्यांची तब्येत लवकरात लवकर नीट व्हावी. त्यांच्या तब्येतीला आराम मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सत्ताधारी पक्षाचे ते महत्त्वाचे नेते आहेत, त्यांनी तब्येत सांभाळावी जास्त दगदग कर नये.
संबंधित बातम्या