मुंबई : मुंबईमध्ये गेले दोन वर्षे कोरोना(Corona)चा प्रसार आहे. हा प्रसार कमी झाला असतानाच डिसेंबर महिन्यापासून पुन्हा रुग्ण वाढ झाली आहे. दिवसाला सुमारे ८ हजार रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाची तिसरी लाट आल्यास लहान मुलांना त्यात मोठ्या प्रमाणात बाधा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. गेल्या महिनाभरातील आकडेवारी पाहिल्यास १९ वर्षाखालील 3516 मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला. या सर्व लहान मुलांनी कोरोनावर मात केली असल्याने महिनाभरात एकाही लहान मुलाचा मृत्यू झालेला नाही.
एकूण 61 मुलांचा मृत्यू
मुंबईमध्ये मार्च 2020मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला. तेव्हापासून 30 नोव्हेंबर 2021पर्यंत 0 ते 9 वयोगटातील 14 हजार 381 लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होऊन 19 मुलांचा मृत्यू झाला. तर 10 ते 19 वयोगटातील 37 हजार 54 मुलांना कोरोनाचा संसर्ग होऊन 42 मुलांचा मृत्यू झाला. 30 नोव्हेंबरपर्यंत 19 वर्षाखालील एकूण 61 मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.
महिनाभरात 3516 मुलांना कोरोना
2 जानेवारीपर्यंत 0 ते 9 वयोगटातील 15 हजार 96 लहान मुलांना तर 10 ते 19 वयोगटातील 39 हजार 855 मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला. गेल्या पावणे दोन वर्षात 30 नोव्हेंबरपर्यंत 51 हजार 435 मुलांना तर 2 जानेवारीपर्यंत 54 हजार 951 लहान मुलांना कोरोनाची लागण झाली. गेल्या महिनाभरात 19 वर्षाखालील तब्बल 3516 मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला.
महिनाभरात एकाही लहान मुलाचा मृत्यू नाही
30 नोव्हेंबरला एकूण 16 हजार 336 मृत्यू झाले होते. आता (2 जानेवारी)पर्यंत एकूण 16 हजार 377 मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईत महिनाभरात केवळ 41 मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यात लहान मुलांच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. 2 जानेवारीपर्यंत 0 ते 9 वयोगटातीला 19 तर 10 ते 19 वयोगटातील 42 अशा 61 मुलांचा मृत्यू झाला आहे. 30 नोव्हेंबर रोजी मुंबईमधील मृत्यू दर 2.14 टक्के इतका होता. मृत्यूंची संख्या कमी झाल्यानं मृत्युदर घसरून 2 जानेवारी रोजी तो 2.05 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.
पालिका सज्ज
सध्या मुंबईमध्ये इतर ठिकाणच्या तुलनेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार कमी आहे. लहान मुलांची संख्या वाढल्यास त्यांच्यावर वेळीच उपचार करता यावेत यासाठी लागणाऱ्या खाटा, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन खाटा आदी उपकरणे औषधें तयार ठेवली आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.