मुंबईच्या या जागांवरून महाविकासआघाडीत तिढा तर महायुती दिग्गज नेत्यांना उतरवणार

| Updated on: Apr 12, 2024 | 9:52 PM

महाविकासाआघाडीत अजूनही जागा वाटपावरुन एकमत झालेले नाही. मुंबईच्या जागांचा तिढा अजूनही कायम आहे. महायुतीच्या उमेदवारांना तगडी फाईट देण्यासाठी महाविकासआघाडी एकमेकांच्या जागा मागत आहेत. तर दुसरीकडे महायुतीकडून दिग्गजांना रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु आहे.

मुंबईच्या या जागांवरून महाविकासआघाडीत तिढा तर महायुती दिग्गज नेत्यांना उतरवणार
mumbai loksabha
Follow us on

Loksabha election 2024 : मविआत मुंबईच्या जागांवरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईतील काँग्रेसची उत्तर मुंबईची जागा मिळावी असं ठाकरे गटानं म्हटलं आहे. तर ठाकरे गटाची मुंबई दक्षिण मध्यची जागा काँग्रेसला द्यावी अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे. सांगली आणि भिवंडीचा तिढा सुटल्यानंतर मविआचं जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलाय आहे. मात्र, पुन्हा एकदा मुंबईतील जागांवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईत काँग्रेसला मिळालेल्या 2 जागांवरून वर्षा गायकवाड नाराज आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसची उत्तर मुंबईची जागा मिळाली तर आम्ही जिंकून दाखवू असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

मुंबईच्या जागांवर तिढा

मुंबईतील जागावाटपात ठाकरे गटाला ४ जागा तर काँग्रेसला २ जागा मिळाल्या आहेत. मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत, मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई, मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल किर्तीकर आणि मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दीना पाटलांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसनं अद्याप आपला उमेदवार दिलेला नाहीये.

काँग्रेसला मिळालेली उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई अशा दोन जागा मिळाल्या आहेत. त्यापैकी उत्तर मुंबईची जागा मिळाल्यास ठाकरे गटाचा उमेदवार जिंकेल असा दावा राऊतांनी केला आहे. दरम्यान ही जागा ठाकरे गटाला गेल्यास काँग्रेसकडे मुंबईत उत्तर मध्य मुंबईचीच जागा शिल्लक राहू शकते.

दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबईच्या जागेसाठी काँग्रेसनं कठोर भूमिका घेतली पाहिजे असं म्हणत वर्षा गायकवाडांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. दिल्लीतील हायकमांडसोबत यासंदर्भात चर्चा करणार असल्याचंही गायकवाड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान वर्षा गायकवाड यांच्या नाराजीवर संजय राऊतांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईतील जागावाटपावरून वर्षा गायकवाड नाराज नसल्याचं राऊतांनी म्हटलं आहे.

उत्तर मुंबई भाजपचा बालेकिल्ला

उत्तर मुंबई हा भाजपचा बालेकिल्ला आहे. उत्तर मुंबईतून 2014 आणि 2019 मधून गोपाळ शेट्टी हे निवडून आले होते. दरम्यान त्यांचं तिकीट कापून पियूष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, पियूष गोयलांविरोधात काँग्रेसकडे भक्कम असा उमेदवार नसल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे उत्तर मुंबईतून विनोद घोसाळकरांना उमेदवारी देण्यात यावी अशी स्थानिक ठाकरे गटाच्या नेत्यांची मागणी आहे.

विनोद घोसाळकरांना उमेदवारी मिळाल्यास त्यांना सहानुभूती मिळण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे ते पियूष गोयल यांना चांगली फाईट देऊ शकतात अशी चर्चा आहे.

एकीकडे मुंबईच्या जागेवरून मविआत तिढेची शक्यता असताना तर दुसरीकडे महायुतीही मविआच्या उमेदवारांविरोधात मुंबईत दिग्गजांना उतरवण्याच्या तयारीत आहे.


उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजनांऐवजी भाजपकडून उज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी सुरु आहे. दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरांचं नाव सर्व्हेत पुढे आलंय. त्यामुळे ही जागा शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. तर मुंबई उत्तर पश्चिमसाठी गजानन किर्तीकरांच्या जागी रवींद्र वायकरांच्या नावाची दोन दिवसात घोषणा होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील जागावाटपावरून काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर आहे. तर दुसरीकडे महायुतीकडून मविआला टक्कर देण्यासाठी दिग्गज नावांची चाचपणी सुरु आहे.