मुंबई : क्रेडिट-डेबिट (सीडी) कार्डवरुन थेट लोकल तिकीट खरेदी करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. रेल्वे सूचना प्रणाली केंद्राकडून (क्रिस) सुरु असलेल्या विशेष सॉफ्टवेअरचे काम पूर्ण झाले असून, विकसित सॉफ्टवेअरमध्ये रेल्वेकडे सुपूर्द करण्यात आले आहे. यामुळे येत्या काळात रेल्वे स्थानकावरील ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशिनमधून (एटीव्हीएम) स्मार्ट कार्डशिवाय लोकलचे तिकीट घेता येणे शक्य आहे.
रेल्वे स्थानकातील एटीव्हीएममधून तिकीट घेण्यासाठी स्वतंत्र स्मार्ट कार्डची आवश्यकता असते. गेल्या काही काळात एटीव्हीएममधील स्मार्ट कार्ड रीडर बंद असणे, स्मार्ट कार्ड रिचार्जसाठी रांग यामुळे थेट सीडी कार्डवरुन लोकल तिकीट खरेदी करता येईल का? या मुद्द्यावर क्रिसने काम करण्यास सुरुवात केली.
एटीव्हीएममध्ये सीडी कार्ड स्वाईप कार्ड मशीनची जोडणी करून क्रिसने एप्रिल महिन्यात चाचणी घेतली. चाचणीत व्यवहार सुरळीत झाला होता मात्र पावती येत नसल्यामुळे क्रिसने पुन्हा आवश्यक बदल करून चाचणी घेतली. ही चाचणी यशस्वी झाली.
रेल्वे स्थानकांवर तिकिटांसाठी सध्या तिकीट खिडक्यांप्रमाणेच एटीव्हीएम, जेटीबीएस, मोबाइल तिकिटिंग अशी व्यवस्था आहे. एटीव्हीएमवरून मध्य रेल्वे मार्गावर रोज सुमारे अडीच लाख आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सुमारे दोन लाख तिकिटांची विक्री होते. प्रत्यक्षात रेल्वेच्या स्मार्ट कार्डपेक्षा नागरिकांकडे क्रेडिट-डेबिट कार्ड मधून तिकीट खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध झाल्यास तिकीट खिडक्यांवरील रांग कमी होण्यास मदत होईल.