मुंबई: आरे कॉलनीमध्ये एका बिबट्याने 64 वर्षांच्या वृद्ध महिलेवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात ही महिला किरकोळ जखमी झाली आहे, सध्या या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, बिबट्याने हल्ला केला तेव्हा या महिलेने जबरदस्त शौर्याचं प्रदर्शन केलं, आणि आपल्या काठीने मारुन बिबट्याला पळवून लावलं. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गेल्या 15 दिवसांत बिबट्याने हल्ला केल्याची ही सहावी घटना आहे. ( old woman-injured-in-leopard-attack-in-aarey-colony-in-goregaon-mumbai-borivali National Park )
घटना नक्की कशी घडली?
या 64 वर्षांच्या आजीबाई आपल्या घराच्या पडवीमध्ये बसल्या होत्या, त्यांच्या हातात आधारासाठी काठी होती. तेवढ्यात झुडूपातून बिबट्याने आजीवर हल्ला केला. हल्ला मागून झाल्याने आधी आजीला काहीच कळालं नाही, मात्र नंतर हा बिबट्याचा हल्ला असल्याचं आजीच्या लक्षात आलं, त्यानंतर आजीने शौर्य दाखवलं आणि हातातल्या काठीने बिबट्यावर हल्ला केला. बिबट्याच्या तोंडावर काठीचे वार झाल्यानंतर बिबट्या घाबरला, आणि त्याने तिथून पळ काढण्यातच शहाणपणा समजला. आजीचा आरडाओरडा ऐकल्यानंतर आजूबाजूचे लोक तिथं आले आणि जखमी आजीला रुग्णालयात दाखल केलं. गोरेगाव पूर्वच्या आरे कॉलनीतील सीईओ कार्यालयाबाहेरच्या भागात बुधवारी रात्री 8 च्या सुमारास हा सगळा प्रकार घडला.
पाहा व्हिडीओ:
4 वर्षांच्या मुलावरही बिबट्याचा हल्ला
आरे कॉलनीत बिबट्यांचे माणसांवरील हल्ले सध्या वाढलेले दिसत आहे. 2 दिवसांपूर्वी आरे कॉलनीच्या युनीट क्रमांक 3 च्या सरकारी क्वार्टरमध्ये राहणाऱ्या आयुष कुमार यादव याच्यावरही बिबट्याने हल्ला केला होता. त्यात तो बचावला, मात्र, आता पुन्हा एकदा बिबट्याने याच परिसरात वृद्ध महिलेवर हल्ला केला आहे. मात्र, महिलेने शौर्य दाखवल्यामुळे बिबट्याला परतावं लागलं. गेल्या 15 दिवसांत या परिसरात तब्बल 6 वेळा बिबट्याने माणसांवर हल्ले केले आहेत.
बिबट्या माणसाला शिकार मानतो का?
बिबट्यांवर संशोधन करणाऱ्या शास्रज्ञांच्या मते, बिबट्या माणसाला शिकार मानत नाही, उलट माणसांपासून लांबच राहण्याचा प्रयत्न करतो. मात्र, जेव्हा त्याला एकादा व्यक्ती बसलेला, वा जमिनीवर खेळणारं बाळ दिसतं, त्याला तो माणूस नाही, तर प्राणी वाटतो, याच भ्रमातून बिबट्या माणसांवर हल्ला करतो.
कुत्र्यांच्या शोधात बिबटे मानवी वस्तीत!
बोरीवली नॅशनल पार्क परिसरात भटक्या कुत्र्यांच्या प्रमाण खूप जास्त आहे. शहरातील भटके कुत्रे पकडून प्रशासन इथं सोडत असल्याचा आरोप याआधीही स्थानिकांकडून झाला आहे. हेच भटके कुत्रे बिबट्यांचं आवडतं खाद्य बनत चाललं आहे. बिबटे शक्यतो अशा कुत्र्यांच्या शोधात जंगलातून बाहेर येतात, कारण, हरीण वा ससापेक्षा कुत्र्यांना पकडणं सोपं असतं, हेच पाहता बिबटे मानवी वस्तीत शिरतात. त्यामुळे मानव-बिबट्या संघर्ष वाढतो, याशिवाय, आरेच्या जंगलाला चारही बाजूने माणसांनी पोखरलं आहे, इथं जंगल तोडून वस्त्या उभ्या राहिल्या आहेत, झोपडपट्ट्या तयार झाल्या आहेत, म्हणजे बिबट्याच्या घरात अतिक्रमण होत आहे, त्यामुळेही माणूस- बिबट्या संघर्ष उभा राहत आहे.
हेही वाचा: