मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबत बंड केलेल्या आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर एक असा आरोप केला जो खुद्द उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही मान्य केला आहे. तो म्हणजे संपर्कात राहू शकलो नाही. मागील चार-पाच दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थन करणारे आमदार हा आकडा 50च्या वर गेल्याचा दावा केला जात आहे. या सर्वांनी उद्धव ठाकरे यांना वेळोवेळी सावध केले होते. मात्र उद्धव ठाकरे वेळ देत नसल्याचा या आमदारांचा आरोप आहे. संजय शिरसाट, महेश शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या (Shivsena) बंडखोर आमदारांनी मुख्यमंत्री भेटत नसल्याची, वेळ देत नसल्याची खंत व्यक्त केली होती. त्यामुळे आमदारांच्या मनातील भावना, लोकांच्या मनातील भावना पोहोचत नसल्याचे त्यांचे म्हणणे होते.
बंडखोर आमदारांचा हा आरोप पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मान्य केला आहे. बंडखोरीनंतरच्या पहिल्याच संवादात त्यांनी हे मान्य केले. ते म्हणाले, मुख्यमंत्रीपद स्वीकारणे हे सर्व अचानक झाले. प्रशासन माहीत नसलेल्या व्यक्तीच्या वाट्याला पहिल्या दोन-तीन महिन्यातच कोविड आला. त्या दरम्यानच्या काळात एक सर्वे करण्यात आला. त्यात तुम्हा सर्वांच्या मेहनतीमुळे तुमचा मुख्यमंत्री पहिल्या सर्वोत्तम पाचमध्ये आला. मुख्यमंत्री भेटत नव्हते, हे काही काळापूर्वी सत्य होते. कारण माझ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतरचे दोन-तीन महिने फार विचित्र होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.
त्या काळात मी कोणालाही भेटू शकत नव्हतो, भेटणे शक्य नव्हते. त्यामुळे मी कोणाला भेटत नाही, हा मुद्दा मान्य आहे, असे ते म्हणाले होते. तर भेटत नव्हतो, म्हणजे कामे होत नव्हती, असे नाही. माझी पहिली कॅबिनेट मिटींग हॉस्पिटलमध्ये ऑनलाइन घेतली होती. आता काही दिवसांपासून सर्वांचीच भेट होत आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, बंडखोर आमदारांना समोर येवून बोलण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे, मात्र बंडखोर राज्यात येण्यास अद्यापही तयार नाहीत. त्यामुळे शिवसेना पक्ष त्यांच्यावर कारवाई करणार आहे.