मुंबई : कोव्हिड प्रतिबंधक लसीकरणासाठी गोरेगाव पूर्वेकडी पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ ओबेरॉय मॉल येथे ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र (Drive In Vaccination Center) सुरु करण्यात आले आहे. स्थानिक आमदार तथा माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन आज (7 जून 2021) करण्यात आले. (one more Drive In Vaccination Center started in Mumbai)
कोव्हिड-19 विषाणू संक्रमण रोखण्यासाठी उपाययोजनांचा एक भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका लसीकरण केंद्रांची संख्या वाढवत आहे. याचाच एक भाग म्हणून ड्राईव्ह इन अर्थात वाहनांतून येवून, वाहनांत बसूनच पात्र नागरिकांना लस घेण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. गोरेगाव पूर्वेकडून पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ ओबेरॉय मॉल येथे देखील ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे.
राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार गजानन कीर्तिकर, आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेचे स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक 51 चे नगरसेवक स्वप्निल टेंबवलकर यांच्या प्रयत्नातून हे ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. स्थानिक आमदार तथा माजी मंत्री रवींद्र वायकर यांनी या केंद्राचे उद्घाटन केले.
या उद्घाटनावेळी महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कोव्हिड संसर्ग प्रतिबंध नियमांचे पालन करुन, कोणताही समारंभ आयोजित न करता मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत या Drive In Vaccination सेंटरचे लोकार्पण करण्यात आले.
देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत जवळपास 80 हून अधिक पालिकेसह खासगी केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. मुंबईतील लोकसंख्या आणि लसीकरण केंद्रांच्या संख्येचा विचार करता पालिकेने प्रथम ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र सुरु केले आहे. यामुळे विशेषत: अपंग लोक आणि ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभे न राहता वाहनात बसून कोरोना लस घेता येत आहे. दादरमध्ये देशातील हे पहिलेच ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ केंद्राला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर पालिकेकडून 14 ठिकाणी अशाप्रकारे ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र सुरु केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्याअंतर्गत आज एक नवीन Drive In Vaccination केंद्र सुरु झाले आहे.
मुंबईतील दादर परिसरातील कोहिनूर टॉवर येथील पार्किंगमध्ये ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले होते. अपंग लोक आणि ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभे न राहता लस घेता यावी, या उद्देशाने या केंद्राची स्थापना करण्यात आली. यावेळी ज्यांना लस घ्यायची आहे, त्यांनी एका पार्किंग गेटने आत जायचे. त्यानंतर गाडीमध्येच बसून लस घ्यायची आणि मग वेगळ्या एक्झिट पॉईंटमधून बाहेर पडायचे, असा ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’चा प्लॅन असतो.
इतर बातम्या
(one more Drive In Vaccination Center started in Mumbai)