मुंबई | 6 फेब्रुवारी 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या प्रकरणावर महत्त्वाचा निकाल जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह बहाल केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाची ऑर्डरदेखील समोर आली आहे. विधीमंडळातील संख्याबळाच्या आधारावर हा निकाल देण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात ट्विस्ट आणणारा एक महत्त्वाची गोष्ट देखील या निकालात समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही लोकप्रतिनिधींचा दोन्ही गटांना पाठिंबा आहे. या लोकप्रतिनिधींकडून निवडणूक आयोगात दोन्ही गटांच्या बाजूने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे. त्यामुळे या मुद्द्याचा विचार आता राष्ट्रवादीच्या पुढच्या न्यायालयीन लढ्यासाठी देखील महत्त्वाचा असण्याची शक्यता आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाच्या ऑर्डरमधून एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 आमदार आणि 1 खासदार यांनी दोन्ही गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. याबाबत अजित पवार यांनादेखील प्रश्न विचारण्यात आला आहे. या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार काहीसे गडबडले. पण त्यांनी थोडक्यात प्रतिक्रिया दिली. याबाबतचा निकाल देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. निवडणूक आयोगाने योग्य तो निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा निकाल हा विधीमंडळाच्या संख्याबळाच्या आधारावर देण्यात आला आहे. अजित पवार गटाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांच्याकडे विधीमंडळातील जास्त संख्याबळ आहे. प्रतिज्ञापत्राच्या तपासणीनंतर आयोग असा निर्णय घेते की, अजित अनंतराव पवार यांना राष्ट्रवादी पक्ष, घड्याळ चिन्हं देण्यात येते. अजित पवार गटाकडून 41 आमदारांचं प्रतिज्ञापत्र तर शरद पवार गटाकडून 15 आमदारांचं प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगात सादर करण्यात आली होती.
विशेष म्हणजे 1 खासदार आणि 5 आमदारांनी दोन्ही गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिलं. अजित पवार गटाला 2 खासदारांच्या समर्थनाचं प्रतिज्ञापज्ञ देण्यात आलं. तर शरद पवार गटाच्या बाजूने 4 खासदारांच्या समर्थनाचं प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगात देण्यात आलं.
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उद्या दुपारी चार वाजेपर्यंत 3 नावं आणि चिन्हं सूचवा, असे आदेश निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला दिले आहेत. शरद पवार गटाने उद्या दुपारपर्यंत नाव न दिल्यास राज्यसभा निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांना अपक्ष मानलं जाईल, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.