मुंबई | 18 ऑक्टोबर 2023 : विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विजय वडेट्टीवार एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पोहोचले आहेत. विजय वडेट्टीवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमकं कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. त्यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा होतेय किंवा वडेट्टीवार नेमकं कोणत्या कारणासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले आहेत? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण या भेटीला सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता महत्त्व प्राप्त झालंय.
विशेष म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीदेखील एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जावून भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली. शिंदे आणि नार्वेकर यांच्या भेटीवर विजय वडेट्टीवार यांनी टीका केली होती. दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनी स्वत: मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्तेत येण्याआधी विरोधी पक्षनेते होते. अजित पवार यांनी सत्तेत येण्याचा निर्णय घेतल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती झालीय. महाविकास आघाडीने वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेते म्हणून नेमणूक केलीय. असं असताना त्यांनी आज अचानक मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आलीय.
“सगळा महाराष्ट्र बघतोय. यांची जाण्याची वेळ झालीय. आता काय पालकमंत्र्यांचं घेऊन बसला आहात? अध्यक्षांच्या कृपेने काही काळ, त्यांचं आजचं मरण उद्यावर, उद्याचं परवावर ढकललं गेलं. पण तिरडी तयार आहे. फक्त ते कधी लेटायची यासाठी अध्यक्ष दिवस काढत आहेत. पेशंट गेलेला आहे. पण अध्यक्षांच्या रुपाने त्याला व्हेंटिलेटरवर जीवंत ठेवलेलं आहे. व्हेटिंलेटर काढलं की तो मेला, अशी परिस्थिती होणार”, अशी खोचक टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. त्यानंतर आता ते स्वत: काही तासांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत.