मुंबई : विधान परिषदेच्या ठाकरे गटातील 3 आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर ठाकरे गट आक्रमक झालाय. उपसभापती निलम गोऱ्हे यांच्यासह, विप्लव बाजोरिया आणि मनिषा कायंदेंवर कारवाईची मागणी, ठाकरे गटानं केलीय. विधान परिषदेतही त्यावरुन हंगामा झाला. अधिवेशनाच्या पहिल्याच, दिवशी विरोधकांनी आपला मोर्चा विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हेंकडे वळवला. उपसभापती असताना, ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हेंनी पक्षांतर करुन ठाकरे गटाची साथ सोडत, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे त्यांना उपसभापती पदावर राहता येणार नाही, अशी भूमिका घेत विरोधकांनी चर्चेची मागणी केली. त्यावरुन शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आमनेसामने आलेत.
विधान परिषदेत गदारोळ झाल्यानंतर, उद्या चर्चेला वेळ देणार. आता काहीही ऐकणार नाही, अशा शब्दात नीलम गोऱ्हे यांनी उत्तर दिलंय. तर ठाकरे गटानंही निलम गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणलाय. महाविकास आघाडीच्या 40 ते 45 आमदारांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली आणि गोऱ्हेंना उपसभापती पदावरुन हटवण्याची मागणी केली.
ठाकरे गटानं, फक्त नीलम गोऱ्हेच नाही तर शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले विधान परिषदेचे आमदार विप्लव बाजोरिया आणि मनिषा कायंदे यांच्या विरोधातही अपात्रतेची नोटीस विधीमंडळ सचिवांना दिलीय. म्हणजे गोऱ्हेंसह, विप्लव बाजोरिया आणि कायंदेंवरही कारवाईची तलवार आहे. तर हे तिघेही, शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यानं ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचंही विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आलंय. कारण काँग्रेस, विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार आहे.
एकूण 78 विधान परिषदेच्या सदस्यसंख्येत भाजपचे 22 आमदार आहेत आणि शिंदेंच्या शिवसेनेचे 3 आमदार आहेत. ठाकरे गटाचे 3 आमदार शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यानं आता त्यांच्या आमदारांची संख्या 8 झालीय. तर काँग्रेसचे 9 आमदार आहेत. त्यामुळे विरोधकांमध्ये काँग्रेसचे संख्याबळ 1 नं अधिक असल्याने काँग्रेस विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार आहे.
अजित पवारांच्या बंडामुळं राष्ट्रवादीत फूट पडल्यानं, विधानसभेत विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे जाणार आहे. त्यापाठोपाठ विधान परिषदेतही काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता होऊ शकतो.