मुंबई : पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टोंनी पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह टीका केली. त्यानंतर देशात रोष उमटला. त्यातच जवानांबदद्लच्या वक्तव्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधीही भाजपच्या निशाण्यावर आलेत. मोदींबद्दलच्या याच आक्षेपार्ह टिप्पणीवरुन पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टोंच्या विरोधात रोष निर्माण झालाय. आपली लायकी विसरत, भुट्टोंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कसाई म्हटलं. ओसामा बिन लादेन मेला पण गुजरातचा कसाई जिवंत आहे, असं भुट्टो म्हणाले आणि आपल्या बुद्धीचं जागतिक प्रदर्शन केलं.
याच वक्तव्याचे पडसाद भारतासह महाराष्ट्रातही उमटले. देशभरात भुट्टो आणि पाकिस्तानच्या विरोधात आंदोलनं झालीत. तर इकडे महाराष्ट्रातही रोष उमटला. पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी जोरदार घोषणाबाजीही झाली.
अमरावतीतही बिलावल भुट्टो आणि पाकिस्तानचे झेंडे जाळत आंदोलन करण्यात आलं. जालन्यात बिलावल भुट्टोंच्या पोस्टरला जोडे मारत जोडे मारो आंदोलन केलं. आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.
नांदेडमध्ये बिलावल भुट्टोंचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. शिर्डीत राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वात आंदोलन झालं. आता बिलावल भुट्टोंनी नीचपणाची पातळी का गाठली? तर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सनसनीत चपराक लगावली.
आधी भुट्टोंनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. त्यावरुन एस जयशंकर यांनी फटकारलं. ज्या पाकिस्ताननं ओसामा बिन लादेनला आश्रय दिला त्या देशानं उपदेश देऊ नये. जगाला मूर्ख बनवू नका, असं जयशंकर म्हणाले. आणि पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मोदींवर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर वातावरण तापलेलं असताना, राहुल गांधींच्याही एका वक्तव्यानं नवा वाद निर्माण झाला आणि भाजपनं राहुल गांधींनाही घेरलं.
केंद्र सरकारवर टीका करताना, राहुल गांधींनी जवानांचा अपमान केल्याची टीका भाजपनं केलीय. राहुल गांधींच्या याच वक्तव्याची तुलना भाजपनं बिलावल भुट्टोंच्या वक्तव्याशी करत काँग्रेसला घेरलंय.
चीनच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला घेरताना, राहुल गांधी जवानांबद्दल बोलून बसले. त्याचवेळी बिलावल भुट्टोंनीही मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानं भुट्टोंबरोबरच भाजपच्या निशाण्यावर राहुल गांधीही आलेत.