नवी दिल्ली – राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांच्या नेतृत्वात शिंदे गट आणि भाजपाचे सरकार आल्यानंतरही राज्यातील काही मोठ्या नेत्यांना पुन्हा राज्यात संधी मिळणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकींनंतर पंकजा मुंडे (Pankja Munde), विनोद तावडे (Vinod Tawade)हे दोन्ही नेते केंद्रीय राजकारणात सक्रिय झाले आहेत. आता भाजपाने केंद्रीय पातळीवर काही राज्यांच्या प्रभारी आणि सहप्रभारींची नियुक्ती जाहीर केली आहे. त्यात विनोद तावडे यांना बिहारच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पंकजा मुंडे यांना मध्यप्रदेशात सहप्रभारीपदाची आहे तीच जबाबदारी कायम ठेवण्यात आलेली आहे. याबाबतचे पत्रक भाजपाच्या केंद्रीय कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आले आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनाही यात संधी मिळाली आहे. त्यांच्याकडे केरळच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे.
BJP appoints party’s state incharges & co-incharges for states
हे सुद्धा वाचाEx-Tripura CM Biplab Deb to be the incharge of Haryana,ex-Gujarat CM Vijay Rupani to be that of Punjab-Chandigarh, ex-Bihar Minister Mangal Pandey to be that of WB & Sambit Patra to be coordinator of northeast states pic.twitter.com/z80tMyGYQw
— ANI (@ANI) September 9, 2022
2020 साली भाजपाने पंकजा मुंडे यांच्याकडे राष्ट्रीय सचिव अशी जबाबदारी दिली होती. त्यानंतर त्यांना मध्य प्रदेशाची सहप्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना पुन्हा मध्य प्रदेशात सहप्रभारी अशी जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यात सत्ताबदल होण्यापूर्वी झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागांसाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळावी अशी त्यांच्या समर्थकांची मागणी होती. मात्र पंकजा मुंडे यांना राज्यापासून दूर ठेवत केंद्रीय राजकारणात ठेवण्याचा केंद्रीय नेतृत्वाचा प्रयत्न दिसतो आहे. मध्य प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी दक्षिणेतील मुरलीधर राव यांच्याकडे देण्यात आलेली आहे. तर सहप्रभारीपदी पंकजा मुंडे यांच्यासोबत डॉ. राम शंकर कठेरीया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पंकजा यांच्याकडे गेल्या वेळी दिलेलीच जबाबदारी ठेवण्यात आलेली आहे.
विनोद तावडे यांना पक्षात मोठी जबाबदारी देण्यात आल्याचे मानण्यात येते आहे. बिहारमध्ये नुकतेच नितीश कुमार यांनी भाजपापासून फारकत घेत राजदसोबत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांत बिहारमध्ये चांगली कामगिरी करण्याचे आव्हान भाजपासमोर असणार आहे. अशा स्थितीत विनोद तावडे यांना हरियाणानंतर आता बिहारची जबाबदारी देण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी त्यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीसपदही देण्यात आलेले आहे.
तर केंद्रात अनेक मंत्रीपदे सांभाळलेले प्रकाश जावडेकर यांच्याकडे केरळच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. केरळमध्ये डाव्यांचा विरोध मोडून त्याठिकाणी 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाचा शिरकाव करण्यासाठी जावडेकरांना प्रयत्न करावे लागणार आहेत.