मुंबई – विधानपरिषद निवडणुकांसाठी भाजपाच्या उमेदवारांमध्ये पंकजा मुंडे (Pankja Munde)यांना स्थान मिळालेलं नाही. याचे पडसाद मराठवाड्यात उमटत असताना, पंकजा मुंडे यांनी मात्र या सगळ्यावर बोलणं टाळलं आहे, दोन दिवसांनी आपण भूमिका स्पष्ट करु, असे सांगत विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याची नाराजीच त्यांची व्यक्त केल्याचे दिसते आहे. आता दोन दिवसांनी पंकजा मुंडे काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. पंकजा मुंडे यांच्याऐवजी गोपानीथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या खंद्या समर्थक, ओबीसी महिला नेत्या आणि पिंपरी चिंचवडच्या भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे. यानिमित्ताने त्यांनी शिवसेनेत (Shivsena)प्रवेश करावा, अशा ऑफर्सही दिल्या जात आहेत. तर यानिमित्ताने मुंडे-महाजन यांचे भाजपातील योगदान पुसून टाकण्याचा प्रयत्न असल्याची टीका शिवसेनेतून करण्यात येते आहे.
पंकजा मुंडे यांचा भाजपाच्या विधानपरिषदेच्या पाच नावात समावेश नसल्याने पंकजा यांचे समर्थक चांगलेच नाराज झाले आहेत. औरंगाबादेत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी, भाजपाच्याच कार्यालयावरच मोर्चा काढत, उमेदवारी नाकारल्याचा निषेध व्यक्त केला आहे. भाजपाचे नेते हे ओबीसी नेतृत्वाला संपवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मराठवाड्यातील परभणी सारख्या जिल्ह्यातूनही उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपावर रोष व्यक्त होताना दिसतो आहे. सोशल मीडियावर नाराजी दर्शवत, ताई नाही, अशा प्रतिक्रिया भाजपाच्या स्थानिक नेत्यांकडून आणि कार्यकरत्यांकडून व्यक्त होतायेत.
दरम्यान पंकजा मुंडे समर्थकांच्या उद्रेकानंतर प्रदेश भाजपा स्तरावरील नेत्यांकडून सारवासरवीचे प्रयत्न होताना दिसतायेत. पंकजा यांना पक्षात मोठे स्थान मिळेल असे संकेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. तर काही वेळा सल्पविराम असतो, पुढे कारकिर्द मोठीच असते असेही ते म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा देवूनही पंकजा यांना विधान परिषदेची उमेदवारी का देण्यात आली नाही, हेही स्वपक्षीयांना पडलेले कोडेच आहे.
नुकत्याच गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतीदिनी गोपीनाथ गडावर झालेल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करु, असे सूचक वक्तव्य केले आहे. पुढे काय असे अनेक जण विचारतात, मात्र आपल्या भविष्याची चिंता नाही, असेही त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत वक्तव्य केले होते.
प्रमोद महाजनांसोबत गोपीनाथ मुंडे यांनी राज्याच्या राजकारणात ओबीसींची मोठी मोट बांधली, माधव म्हणजेच माळी, धनगर आणि वंजारी हे समीकरण पक्के करत त्यांनी भाजपाचा जनाधार राज्यात पक्का केला. लोकनेता अशी त्यांची ओळख होती. बीड जिल्ह्यात मुंडे परिवाराचा दबदबा त्यांनी राजकारणात निर्माण केला. वंजारी समाजात तसचे भटक्या-विमुक्तांमध्येही पाड्यापाड्यावर ओळख आणि मान्य असलेल्या नेता अशी त्यांची ओळख होती. अशा स्थितीत गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूपासून भाजपाच्या नेतृत्वाबाबत अढी निर्माण झाली. पंकजा यांना फडणवीस सरकारच्या कार्यकाळात डावलण्यात आल्याची नेहमीच चर्चा होत राहिली. राज्यभेतही त्यांच्याऐवजी औरंगाबादच्या मुंडे समर्थक भागवत कराडांना उमेदवारी देण्यात आली, त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपदही देण्यात आले. मात्र पंकजा मुंडेंना न्याय मिळाला नाही, अशी भावना वाढली. आताही विधानपरिषदेत त्यांना संधी नाकारल्यान भाजपाच्या विरोधातला मेसेज मुंडे समर्थकात गेला आहे.
पंकजा मुंडे राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्या असल्या तरी त्यांना भाजपात मोठे स्थान देण्यात आले आहे. पंकजांना राष्ट्रीय पातळीवर सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच मध्य प्रदेशच्या प्रभारी म्हणूनही त्या कार्यरत आहे. त्यांच्या लहान भगिनी प्रीतम मुंडे या बीडच्या लोकसभा खासदार आहेत. अशा स्थितीत आगामी काळात त्यांच्याकडे केंद्रीय पातळीवर मंत्रीपद वा अधिक मोठी जबाबदारी देण्यात येईल, अशी शक्यताही वर्तवण्यात येते आहे.