मुंबई | 26 सप्टेंबर 2023 : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काही महिन्यांपूर्वी मोठं वक्तव्य केलेलं. आपण आपल्या सर्व व्यथा, तक्रार आणि भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याजवळ मांडू. अमित शाह हे आपले नेते आहेत. त्यांच्याकडे सविस्तर भूमिका मांडू, असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. आपण भूमिका मांडण्यासाठी अमित शाह यांची वेळ देखील मागितल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण आता मोठी बातमी समोर आलीय. अमित शाह यांनी पंकजा मुंडे यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी वेळच दिला नाही, असं खुद्द पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे. पंकजा मुंडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘रोखठोक कार्यक्रमात’ विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी याबाबत भाष्य केलं.
“नाही, अजून तरी मला त्यांची वेळ मिळालेली नाही. ते मध्यंतरी लोकसभेच्या अधिवेशनात व्यस्त होते. त्यांची वेळ का नाही मिळाली? याचं उत्तर मी देऊ शकत नाही. त्यांची वेळ अजून मिळाली नाही. ते आता निवडणुकीत व्यस्थ असतील. ते जेव्हा वेळ देतील तेव्हा मी सांगेन”, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.
“माझ्या मनातलं नाही, मी त्यांना सांगणार, हे माझे लोकं आहेत, यांची अस्वस्थता आहे. पण मी अमित शाह यांना सर्व सांगणार असं केव्हा म्हणाले होते? हे सर्व राजकीय गणितं बसण्याच्या आधी म्हणाले होते. आता तर अजून वेगळं झालंय. आता तर सत्तेमध्ये आणखी एक पार्टनर आलाय. तेव्हाचं आणि आतामध्ये खूप फरक पडलाय. त्यामुळे ते मला वेळ देतील तेव्हा मी त्यांच्याकडे माझी भूमिका मांडेन”, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.
पंकजा मुंडे सध्या अडचणीतून जात आहेत. त्यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला जीएसटी विभागाने 19 कोटींचा कर चुकवला नसल्याची नोटीस पाठवली असल्याची माहिती समोर आलीय. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी नोटीसला नोटीसने उत्तर द्यायचं असतं, अशी भूमिका मांडली. याबाबत पंकजा यांना प्रश्न विचारला असता, ती नोटीस नव्हती तर कारवाई होती, असं त्यांनी स्पष्ट केलं.