मुंबई : सर्वसामान्य व्यक्तीच्या शरीरात असणाऱ्या किडनीचं वजन हे 150 ग्रॅमपेक्षा कमी असतं. मात्र, ग्लोबल हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाच्या शरीरात चक्क 7 आणि 5.8 किलो वजनाच्या किडनी आढल्या आहेत. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन रुग्णाच्या शरीरातून या दोन्ही किडनी काढल्या आहेत. शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या रुग्णाचं नाव रोमन असं आहे. ते गोव्याचे रहिवासी आहेत (Kidney transplantation in Global Hospital).
रोमन यांच्या शरीरातून काढण्यात आलेल्या किडनींचे वजन हे सर्वसामान्य किडनीच्या वजनापेक्षा तब्बल 40 पटीने जास्त आहे. सामान्य किडनीचे वजन सुमारे 150 ग्रॅम असते आणि त्याची लांबी सुमारे 8-10 सेमी असते. पण रोमन यांच्या शरीरातून काढण्यात आलेल्या किडनींची लांबी सुमारे 26 सेमी आणि 21 सेमी होती.
रोमन यांना ऑटोसोमल पॉलिसिस्टिक किडनी डिसीज (एडीपीकेडी) हा अनुवंशिक आजार झाला होता. अखेर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करुन सर्जन्सनी 7 किलो आणि 5.8 किलो वजनाची किडनी काढून टाकली आहेत. या दोन्ही किडन्यांचे एकूण वजन 12.8 किलो होते. इतक्या जास्त वजनाची किडनी काढल्याची ही भारतातील पहिलीच शस्त्रक्रिया होती (Kidney transplantation in Global Hospital).
मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमधील युरोलॉजी आणि रेनल ट्रान्सप्लांट विभागाचे संचालक डॉ. प्रदीप राव आणि मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलच्या इन्स्टिट्यूट ऑफ रेनल सायन्सेसचे संचालक डॉ. भरत शहा यांच्या नेतृत्वाखालील टीमने यशस्वीपणे या किडनी काढल्या आणि त्याचवेळी स्वॅप किडनी ट्रान्सप्लांटेशनची शस्त्रक्रिया करुन या रुग्णाला नवसंजीवनी देण्यात आली.
अमरावतीचे नितीन यांचीदेखील किडनी निकामी झाले होते. त्यामुळे त्यांच्या पत्नी त्यांना किडनी देणार होत्या. तर गोव्याचे रोमन यांनादेखील त्यांच्या पत्नी किडनी देणार होत्या. मात्र, रक्तगट जुळत नसल्यामुळे आणि इतर कारणामुळे ते शक्य नव्हतं. अखेर स्वॅप किडनी ट्रान्सप्लांटमार्फत दोन्ही रुग्णांची यशस्वीपणे किडनी काढण्यात आली आणि त्याचवेळी स्वॅप किडनी ट्रान्सप्लांटेशनची शस्त्रक्रिया करण्यात आली.
स्वॅप किडनी ट्रान्सप्लांट किंवा ज्याला पेअर्ड किडनी डोनेशन असेही म्हटले जाते. त्या शस्त्रक्रियेमध्ये दोन कुटुंबांमधील दाते आपले किडनी परस्परांच्या कुटुंबियांना देतात. गोव्यातील रोमन आणि अमरावती येथील नितीन यांच्यावर किडनी निकामी झाल्यामुळे किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करावी लागणार होती. डॉक्टरांना समजले की रोमन आणि त्यांच्या पत्नीचा रक्तगट एकमेकांशी जुळणारा नव्हता आणि नितीन आणि त्यांच्या पत्नीच्या ऊतीचा प्रकार एकमेकांशी जुळणारा नव्हता. डॉक्टरांनी दोन्ही कुटुंबांशी स्वॅप किडनी ट्रान्सप्लांटबाबत चर्चा केली आणि दोन्ही कुटुंबियांना तत्काळ मान्यता दिली. आवश्यक मान्यता प्राप्त केल्यानंतर रुग्णांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर दोन्ही प्रत्यारोपणे करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर दोन्ही रुग्णांची प्रकृती सुधारली आहे आणि दोघेही आपल्या दैनंदिन क्रिया सहज करु लागले आहेत.
-डॉ. भरत शाह
गोव्याचे रहिवासी असलेल्या रोमन यांची किडनी निकामी झाली होती आणि 41 व्या वर्षी ते डायलिसिसवर होते. कारण त्यांना ऑटोसोमल डॉमिनंट पॉलिसिस्टिक किडनी डिसीज (एडीपीकेडी) हा आजार होता. हा एक अनुवंशिक आजार असून यात मूत्रपिंडामध्ये अनेक गळू तयार होतात. त्यामुळे मूत्रिपिंडाच्या ऊतींची कार्यक्षमता कमी होते. रुग्णाचे आयुष्य बिकट झाले होते. त्यांना आपली दैनंदिन कामे करता येत नव्हती. कारण त्यांना वारंवार धाप लागत होती, चालता येत नव्हते आणि त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी कमी झाली होती. रुग्णाला ग्लोबल हॉस्पिटलमध्ये जाण्याची शिफारस करण्यात आली. या हॉस्पिटलमधील स्वॅप प्रत्यारोपण नोंदवहीमध्ये असलेल्या दात्यांच्या नोंदीच्या माध्यमातून ग्लोबल हॉस्पिटलमधील मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञांना सुयोग्य मूत्रपिंड मिळाले.
मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमधील युरोलॉजी आणि रेनल ट्रान्सप्लांट विभागाचे संचालक डॉ. प्रदीप राव म्हणाले, “आमच्या हॉस्पिटलमध्ये बहुधा कीहोल शस्त्रक्रिया या लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रियेच्या माध्यमातून किडनी काढण्यात येत असली तरी रोमन यांच्या किडनींची लांबी सुमारे फुटभर होती. त्यामुळे लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर ओपन शस्त्रक्रिया करण्यात आली. या माध्यमातून आम्ही 12.8 किलो वजन असलेली दोन्ही मूत्रपिंडे आम्ही एक छेद देऊन काढू शकलो
– डॉ. प्रदीप राव, युरोलॉजी आणि रेनल ट्रान्सप्लांट विभाग संचालक, ग्लोबल हॉस्पिटल
“बहु-अवयव प्रत्यारोपणात आघाडीवर असलेल्या आमच्या वैद्यकीय टीमतर्फे प्रत्येक रुग्णाच्या विशिष्ट गरजा पुरविण्यासाठी अविरत प्रयत्न करण्यात येतात. या प्रकरणात, रक्त गट आणि ऊतींचा प्रकार एकमेकांशी न जुळल्यामुळे स्वॅप प्रत्यारोपणाविषयी चर्चा केली आणि प्रत्यारोपणानंतर खूप वेदना किंवा इतर आजार होऊ नयेत यासाठी ओपन नेफ्रेक्टोमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोण्याही प्रकारच्या स्पेशॅलिटीमधील गुंतागुंतीच्या वैद्यकीय समस्यांवर नावीन्यपूर्ण वैद्यकीय उपचार पुरविण्यासाठी आमच्याकडून नेहमी प्रयत्न करण्यात येतो”, असे मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विवेक तळवलीकर म्हणाले.
एडीपीकेडी हा अनुवंशिक आजार आहे आणि माझ्या आईलाही या आजारामुळे झालेला त्रास मी पाहिला आहे. १० वर्षांपूर्वी मला एडीपीकेडी असल्याचे निदान झाले आणि त्यावर औषधांनी उपचार करण्यात आले. सुमारे दीड वर्षांपासून माझी प्रकृती खालावत चालली होती आणि मला दैनंदिन कामे करणेही शक्य होत नव्हते. माझे पोट फुगत चालले होते आणि माझे वजनही वाढत चालले होते. मला थोडेसे चालल्यावरही धाप लागू लागली होती. प्रत्यारोपण शस्त्रक्रिेयेआधी माझ्यावर नेफ्रेक्टोमी करण्यात आली आणि शस्त्रक्रिया केल्यानंतर मला बरे वाटू लागले. पहिल्या शस्त्रक्रियेनंतर माझे सुमारे २५ किलो वजन कमी झाले. ग्लोबल हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि अमरावती येथील कुटुंबाचे मी आभार मानतो, ज्यांनी मला नवजीवन दिले. आता माझी प्रकृती हळुहळू पूर्वपदावर येत आहे.
– रोमन, रुग्ण