मुंबई: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (sharad pawar) हे दोघेही नेते राजकारणात एकमेकांवर तुटून पडायचे. पण या दोघांमध्ये व्यक्तिगत पातळीवर स्नेह होता. घरोबा होता. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे असोत की भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन हे सुद्धा शरद पवारांचे राजकीय वैरी होते. पण व्यक्तिगत पातळीवर या नेत्यांचे चांगले संबंध होते. कोणतीही व्यक्तिगत कटुता नव्हती. अनेकदा निवडणुकीच्या रणमैदानात एकमेकांवर तुटून पडणारे राज्यातील नेते अडचणीच्या काळात मात्र एकमेकांसाठी धावून जाताना उभ्या महाराष्ट्राने पाहिले. एकमेकांच्या घरचे लग्न सोहळे असो, सुख-दु:खाचे प्रसंग असो राज्यातील नेते एकमेकांच्या मदतीला नेहमीच धावून गेले. गान सम्राज्ञी लता मंगेशकर (lata mangeshkar)यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी महाराष्ट्राच्या या संस्कृतीचे दर्शन घडले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना चालताना थोडा त्रास होतो. त्यामुळे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते पीयूष गोयल हे शरद पवार यांचा हात हातात घेऊन चालताना दिसले. अन् महाराष्ट्राची राजकीय संस्कृती किती महान आणि प्रगल्भ असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं.
गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांचं काल वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. दीर्घ आजाराने त्यांचा मृत्यू झाला. तब्बल 28 दिवस त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शरीर उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने रविवारी अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. लतादीदींच्या निधनानंतर दुपारी त्यांचं पार्थिव त्यांच्या पेडर रोडवरील प्रभू कुंज निवासस्थानी आणण्यात आलं. या ठिकाणी पार्थिव काही काळ ठेवल्यानंतर त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. शिवाजी पार्क मैदानात दुपारी 4.30 वाजता त्यांची अंत्ययात्रा आली. यावेळी राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि बॉलिवूड जगतातील सेलिब्रिटींसह सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व पक्षीय नेतेही उपस्थित होते.
शिवाजी पार्कात लतादीदीचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं. तिथेच बाजूला सर्वांची बसण्याची व्यवस्था केली होती. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल बाजूबाजूलाच बसले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अधूनमधून संवाद होत असल्याचंही दिसत होतं. त्यांच्यामागे अभिनेता शाहरुख खान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर बसलेले होते. तर पवारांच्या शेजारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे बसलेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवाजी पार्कात आल्यानंतर त्यांनी सर्व नेत्यांना नमस्कार केला. त्यानंतर मंगेशकर कुटुंबीयांचं सांत्वन केलं. नंतर मोदींनी लतादीदींना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर मोदींचा ताफा निघून गेला. मोदी गेल्यानंतर राजकीय नेते आणि सेलिब्रिटींनी लतादीदींना पुष्पहार अर्पण केला. शरद पवार आणि गोयल यांनी सोबत जाऊन लतादीदींना पुष्पहार अर्पण केला. वयोमानामुळे आणि चालता येत नसल्याने पवार पायरी चढू शकले नाही. त्यामुळे त्यांनी खाली उभं राहूनच लतादीदींच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. तर जाताना गोयल यांनी पवारांचा हात धरला आणि त्यांना खुर्चीपर्यंत जाण्यासाठी साथ केली. राजकारणातील एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले नेते एकमेकांची काळजी घेत असल्याचं आणि ज्येष्ठ नेत्याची काळजी घेत असल्याचं चित्रं पाहून अनेकांना भारावल्यासारखं झालं. एवढ्या दु:खाच्या प्रसंगातही हा विरळा क्षण लोकांच्या नजरेतून सुटला नाही. महाराष्ट्रातील ही राजकीय संस्कृती किती श्रेष्ठ आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
संबंधित बातम्या:
Fact Check: ‘त्या’ फोटोत शाहरुखची बायको नाही? मग ती कोण? ‘आयडीया ऑफ इंडियाच्या’? फोटोचं वास्तव काय?