मुंबई: लतादीदींचं (Lata Mangeshkar) व्यक्तिमत्त्व युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे. आपला देश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत असतानाच दीदी आपल्याला सोडून गेल्या. त्यांनी भारताला आवाज दिला. त्या खऱ्या अर्थाने भारताच्या (india) सांस्कृतिक राजदूत होत्या, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी स्वरसम्राज्ञी दिवंगत लता मंगेशकर यांची मुक्तकंठाने स्तुती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर मोदींनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी लतादीदींची मुक्तकंठाने स्तुती करत हा पुरस्कार देशातील जनतेला अर्पित करणत असल्याचं जाहीर केलं. मी सहसा पुरस्कार स्वीकारत नाही. पण लतादीदी या माझ्या मोठी बहीण होत्या. त्या देशाचा आवाज होत्या. त्यांच्या नावाचा पुरस्कार मला टाळताच आला नाही. त्यामुळे मी आज तुमच्यासमोर उपस्थित आहे, असंही मोदी यांनी सांगितलं. माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडला.
लतादीदींनी सिनेमाच्या चार पाच पिढ्यांना आवाज दिला. देशाने त्यांना भारतरत्न दिला आणि देश गौरन्वित झाला. संपूर्ण जग त्यांना सूरसम्राज्ञी मानायचं. पण त्या स्वत:ला संगीत क्षेत्रातील साध्वी मानायच्या. म्हणूनच त्या रेकॉर्डिंगला जाताना चप्पल बाहेर काढून जायचा. आदिशंकराच्या अद्वैतवाच्या सिद्धांताला आपण समजून घेताना गोंधळात पडतो. मी आदिशंकराच्या अद्वैताचा सिद्धांत समजून घेताना प्रयत्न करतो तेव्हा ईश्वराचा उच्चारही स्वरा शिवाय अपूर्ण आहे हे दिसून येतं. ईश्वरात स्वर एकत्र आहे. संगीत आपल्या हृदयावर प्रभाव पाडतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
या पुरस्काराशी दिनानाथ मंगेशकरांचं नाव जोडलं गेलं आहे. आम्ही दिनानाथ मंगेशकर यांचेही ऋणी आहोत. लतादीदींमध्ये राष्ट्रभक्तीची भावना प्रखर होती. त्याची प्रेरणा त्यांचे वडील होते. ब्रिटिश व्हाईसरायच्या समोर दिनानाथ मंगेशकर यांनी सावरकरांचे गाणं गायलं होतं. सावरकरांचं हे गीत ब्रिटीशांना आव्हान देणारं होतं. पण दिनानाथ मंगेशकर यांनी धाडस करून हे गीत गायलं. हे धाडस तेच करू शकतात. हे धाडस दिनानाथ मंगेशकरांनी आपल्या कुटुंबाला वारसा म्हणून दिलं आहे, असं ते म्हणाले. लतादीदींना समाज क्षेत्रात कार्य करायचं होतं. मात्र, संगीत क्षेत्रात आल्या तरी त्यांच्यातील राष्ट्रभक्ती तसूभरही कमी झाली नाही. शिवकल्याण राज्याच्या माध्यमातून शिवाजी महाराजांवरील गाणं आणि रामदासांची वचनं त्यांनी अजरामर केली, असंही त्यांनी सांगितलं.
मोठी बहीण म्हणून त्यांनी खूप प्रेम दिलं. यापेक्षा जीवनाचं सार्थक काय असेल. जेव्हा रक्षा बंधन येईल तेव्हा दीदी नसेल. मी पुरस्कार घेत नाही. पण बहीणीच्या नावाने पुरस्कार मिळतो त्यामुळे मी आलो. मंगेशकर कुटुंबाचा माझ्यावर हक्क आहे. आदिनाथचा मेसेज आला. तेव्हा मी किती बीझी आहे हे पाहिलं नाही. म्हटलं होकार द्या. मला नकार देणं शक्यच नव्हतं. मी हा पुरस्कार जनतेला अर्पित करतो. लतादीदी जनतेच्या दीदी होत्या. त्यामुळे हा पुरस्कारही जनतेला अर्पित करतो, असं मोदी म्हणाले.
मी विचार करत होतो की दीदीशी माझं नातं कधीपासून किती जुनं आहे. कदाचित चार साडेचार दशक झाले असतील. सुधीर फडके यांनी माझा परिचय करून दिला होता. तेव्हापासून या कुटुंबासोबत अपार स्नेह आहे. या कुटुंबाशी संबंधित अगणित घटना माझ्या जीवनाचा हिस्सा बनल्या. माझ्यासाठी लतादीदी सूर साम्राज्ञीसह माझी मोठी बहीण होत्या, त्याचा मला अभिमान वाटतो, असं मोदी म्हणाले.