मुंबई : कोकणात पूरानं थैमान घातलंय. अनेक लोक बेघर झाले आहेत. काही जण बेपत्ताही झालेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. तसेच कोकणाला मदत करण्याचं आश्वासन दिलंय. मोदींनी फोन करुन राज्यातील पूरस्थितीची माहिती घेतली. त्याचबरोबर केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासनही पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील सकाळपासूनच राज्यातील पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
नरेंद्र मोदी यांनी या चर्चेची माहिती मराठीत ट्विट करुन दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधून महाराष्ट्रातल्या काही भागातला पूर आणि मुसळधार पाऊस याबाबत चर्चा केली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि सुखरूपतेसाठी प्रार्थना करीत आहे.”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधून महाराष्ट्रातल्या काही भागातला पूर आणि मुसळधार पाऊस याबाबत चर्चा केली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि सुखरूपतेसाठी प्रार्थना करीत आहे @OfficeofUT
— Narendra Modi (@narendramodi) July 22, 2021
दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर देखील भरपावसात महाड, माणगाव परिसरातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोहचले. तळईपासून अर्धा तासाच्या अंतरावर ते, गिरीश महाजन, आमदार निरंजन डावखरे अडकून पडले आहेत. दरेकर म्हणाले, “तळईचे ग्रामस्थ तुळशीराम पोळ यांनी गावात 25 ते 30 घरं दरड कोसळून त्याखाली आल्याची माहिती दिलीय. यात कुणी जखमी किंवा मृत्यूमुखी पडल्याची माहिती मिळालेली नाही.”
“आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो. त्यांनी जवळच्या बिरवाडी पोलीस स्टेशनवरुन अधिकाऱ्यांना पाठवलं आहे. उपजिल्हाधिकारीही जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हीही एका ठिकाणी थांबलो आहोत. पाणी ओसरलं नाही तर एनडीआरएफच्या बोटीतून पुढे दासगावला जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुंबईहून बिस्किट, चटई आणि पांघरुन देण्याची व्यवस्था आम्ही करत आहोत,” अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी दिलीय.
PM Narendra Modi call CM Uddhav Thackeray over Kokan flood