मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते मुंबईतील आज विविध विकासकामांचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांना आगामी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला निवडून देण्याचं आवाहन केलं. दिल्लीपासून महाराष्ट्र आणि मुंबईतही भाजपला पाठिंबा द्या. त्यामुळे विकासकामांना गती मिळायला मदत होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांना आवाहन केलं. यावेळी नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठ वर्षात भारतात कोणकोणते सकारात्मक बदल झाले याविषयी माहिती दिली. नरेंद्र मोदी यांच्या आजच्या भाषणातील दहा मोठे आणि महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
“स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आज भारत मोठं स्वप्न पाहण्याचं आणि पूर्ण करण्याचं धाडस करतोय. नाहीतर याआधी फक्त गरिबीवर चर्चा करण्यात आणि दुसऱ्या देशाकडून मागामाग करण्यातच गेला. पण आता आझाद भारताच्या मोठ्या संकल्पनांवर जगाचा विश्वास आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
“एकनाथ शिंदे यांनी दावोसमधला आपला अनुभव व्यक्त केला. सगळीकडे तसाच अनुभव येतोय. भारताबद्दल सगळ्यांच्या मनात सकारात्मक भावना आहेत. भारताकडे आशेने पाहिलं जातंय. आज प्रत्येकाला वाटतंय की भारत ते करतोय जे विकासासाठी आणि समृद्धीसाठी खूप आवश्यक आहे. आज भारत अभूतपूर्व आत्मविश्वासाने भरलेला आहे”, असा दावा मोदींनी केला.
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने स्वराज्याची भावना आजच्या हिंदुस्तानात डबल इंजिन सरकारमध्ये प्रबळ रुपाने प्रकट होतंय. आम्ही ती वेळ पाहिलीय जेव्हा गरिबांच्या कल्याणाच्या पैशांमध्ये घोटाळा केला जायचा. संवेदनशीलतेचा नाव नव्हतं. त्यामुळे कोट्यवधी नागरिकांना नुकसान झालं”, असा दावा त्यांनी केला.
“आम्ही गेल्या आठ वर्षात सकारात्मक बदल केलाय. भारत आता सगळ्याच क्षेत्रात पुढे जातोय. आज देशात एकीकडे घर, टॉयलेट, वीज, कुकिंग गॅस, मोफत आरोग्य, मेडिकल कॉलेज, आयआयटी सारख्या अनेक सुविधांचा वेगाने निर्माण होत आहे. दुसरीकडे आधुनिक कनेक्टिविटीकडेही लक्ष आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
“मुंबईला भविष्यासाठी तयार करणं हे डबल इंजिन सरकारची प्राथमिकता आहे. मुंबई मेट्रोचं काम जोरात सुरु आहे. २०१४ मध्ये मुंबईत फक्त १४ किमी मेट्रो सुरु होती. पण जेव्हा तुम्ही डबल इंजिन सरकार आणलं तेव्हा मेट्रोचा विस्तार जोरात झाला. काही काळासाठी विस्ताराचा वेग मंदावला. पण शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर पुन्हा वेगाने काम होऊ लागलं आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
“मुंबईत 300 किमी मेट्रो नेटवर्कसाठी आम्ही वेगाने धावत आहोत. आज देशभरात रेल्वेला आधुनिक करण्यासाठी काम सुरु आहे. मुंबई लोकल आणि महाराष्ट्राची रेल कनेक्टिविटीला त्याचा फायदा होत आहे. डबल इंजिन सरकार सामान्य नागरिकालाही आधुनिक सुविधा, फास्ट स्पिडचा अनुभव देण्याचा विचार करत आहे, जे कधी फक्त नुकत्याच लोकांना मिळायच्या. त्यामुळेच आता रेल्वे स्टेशनला विमानतळासारखं रुप दिलं जातंय”, असं मोदींनी सांगितलं.
“इथे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातील. सामान्य नागरिकांना सुविधा मिळो हेच ध्येय आहे. फक्त रेल्वे सुविधाच नाही तर अनेक सुविधांचं रेल्वे स्टेशन हब असणार. बस, मेट्रो ट्रेन सुविधा मिळेल”, असं आश्वासन मोदींनी दिलं.
“येणाऱ्या आगामी वर्षात मुंबईचा कायापालट होईल. प्रत्येकासाठी मुंबईत राहणं सुविधेचं होईल. याशिवाय आजूबाजूच्या जिल्ह्यांवरुन मुंबईत येणं-जाणं सुलभ होईल. कोस्टल रोड, नवी मुंबई विमानतळ, धारावी पुनर्विकास, जुन्या चाळींचा विकास सगळ्या गोष्टी आता ट्रॅकवर येत आहेत. मी त्यासाठी शिंदे-फडणवीस यांना अभिनंदन करतोय”, असं मोदी म्हणाले.
“मुंबईच्या रस्त्यांना सुधारण्यासाठी जे काम सुरु झालंय ते डबल इंजिन सरकारचा निश्चय दाखवतो. आम्ही प्रदूषणपासून स्वच्छता प्रयत्न प्रत्येक सुविधेसाठी काम करत आहोत”, असं मोदी म्हणाले.
“शहरांच्या विकासासाठी देशाजवळ सामर्थ्य आणि राजकीय इच्छाशक्ती याची कमतरता नाही. पण आम्हाला एक गोष्ट समजायला हवी. मुंबई सारख्या शहरात प्रोजक्टला तोपर्यंत गती मिळणार नाही जोपर्यंत स्थानिक पालिका प्राथमिकता तेज विकासाची नसणार”, अशी भावना मोदींनी व्यक्त केली.
“जेव्हा राज्यात विकासासाठी समर्पित सरकार असते, जेव्हा शहरात सुशासनासाठी समर्पित शासन असेल तेव्हा हे काम वेगाने होतं. त्यामुळे मुंबईच्या विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे”, असं मोदी म्हणाले.
“मुंबईच्या विकासासाठी बजेटची काहीच कमी नाही. फक्त मुंबईच्या हक्काचा पैसा योग्य ठिकाणी लागायला हवी. तो पैसा भ्रष्टाचारात लागेल, विकासाला रोखण्याची प्रवृत्ती असेल तर मुंबईचा विकास कसा होईल?”, असा सवाल त्यांनी केला.
“मुंबईकर त्रास सोसत राहिले, शहर विकासासाठी याचना करत राहिले, पण ही स्थिती मुंबईत आणि शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात कधीच होऊ शकत नाही”, असा दावा त्यांनी केला.
“मी मुंबईकरांकडे जबाबदारी ही गोष्ट सांगतोय, भाजप, एनडीए सरकारने विकासासाठी राजकारण आणलं नाही. विकास हेच आमची प्राथमिकता आहे. आम्ही विकास कामांना कधीच ब्रेक लावत नाही. पण आम्ही मुंबईत असं वारंवार होताना पाहिलं आहे”, असं मोदी म्हणाले.
आमच्या प्रत्येक कामात अडचणी आणल्या गेल्या. असं पुन्हा होऊ नये यासाठी दिल्लीपासून महाराष्ट्र आणि मुंबईपर्यंत सगळ्यांची ताकद लागायला हवी. एक ताळमेळची व्यवस्था व्हावी”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.