मुंबई आणि गणेशोत्सवाचं फार अतूट असं नातं आहे. या गणेशोत्सवात संपूर्ण मुंबई रस्त्यावर बघायला मिळते. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची आणि फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी अशा अनेक गोष्टी बघायला मिळतात. असंच वातावरण आज मुंबईत बघायला मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज घाटकोरपमध्ये मोठा रोड शो आयोजित करण्यात आला. अशोक सिल्क मिल ते हवेली ब्रीज असा रोड शो काढण्यात आला. या रोड शोला हजारो नागरिकांनी गर्दी केलेली बघायला मिळाली. मुंबईत अगदी गणेशोत्सवाला उसळते तशीच गर्दी मोदींच्या रोड शोला बघायला मिळाली. या रोड शोमध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
नरेंद्र मोदी अशोक सिल्क मिल परिसरात दाखल झाले. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. मोदींनी सर्वात आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन केलं. यानंतर त्यांच्या रोड शोला सुरुवात झाली. या रोड शोमध्ये मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर महत्त्वाचे देखील नेते सहभागी होते. या रोड शोच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या माध्यमातून मोदींचं स्वागत करण्यात आलं. कोळी बांधवांनी कोळीनृत्य सादर करत मोदींचं स्वागत केलं.
येत्या 20 मे ला राज्यात शेवटचं पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. या शेवटच्या टप्प्यात एकूण 13 जागांवर मतदान होणार आहे. यापैकी सहा मतदारसंघ हे मुंबईतील आहेत. मोदींनी त्यांच्या आजच्या दौऱ्यातून या सर्व जागांचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला. मोदींची आज नाशिकमध्ये सभा पार पडली. त्यानंतर कल्याणमध्ये सभा पार पडली. यानंतर मुंबई थेट मुंबईच्या रस्त्यावर उतरले. नरेंद्र मोदी यांचा मुंबईतला हा पहिला रोड शो होता.
या रोड शोमध्ये विविधता दर्शवण्यात आली. रोड शोमध्ये ठिकठिकाणी ढोल-ताशांचे विविध पथक बघायला मिळाले. तरुण-तरुणी ढोल-ताशांच्या गजरावर लेझिम खेळताना दिसले. अनेक नागरिकांकडून पारंपरिक वेशभूषा परिधान करण्यात आली होती. या वेशभूषेतून मराठमोळी संस्कृतीचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला गेला. या रोड शोमध्ये मराठी भाषिक, उत्तर भारतीय, राजस्थानी, दक्षिण भारतीय, उच्चभ्रू वस्ती आणि सर्वासामान्य वस्तीमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलेला बघायला मिळाला.