पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या मुंबईतील घाटकोपरमध्ये मोठा रोड-शो होणार आहे. त्यांच्या रोड-शोची प्रशासनाकडून जोरदार तयारी केली जात आहे. मोदींच्या रोड-शोच्या पार्श्वभूमीवर घाटकोपरमध्ये सीसीटीव्ही बसवण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई पोलिसांकडून रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरेकिंटग करायला सुरुवात झाली आहे. पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त असणार आहे. मोदींच्या रोड-शो असल्यामुळे मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या गर्दीत सुरक्षेची खबरदारी मुंबई पोलिसांकडून आतापासून घेतली जात आहे. ज्या उंच इमारती आहेत तिथे सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या झाडांच्या ज्या फांद्या अडसर ठरत होत्या त्या मुंबई महापालिकेच्या वतीने तोडण्यात आल्या आहेत. रसत्याच्या ठिकठिकाणी मध्यभागी असणाऱ्या खांबांवर सीसीटीव्ही असणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या संध्याकाळी साडेचार वाजता मुबईत रोड-शो असणार आहे. अशोक सिल्क मिल ते हवेली ब्रीज असा मोदींचा रोड-शो असणार आहे. मोदींचा घाटकोपरमध्ये जवळपास अडीच किमीचा रोड-शो असणार आहे. मुंबईत माहौल बनवण्यासाठी भाजपकडून मोदींच्या रोड-शोचं आयोजन करण्यात आलं आहे. अशोक सिल्क मिल पासून सर्वोदय सिग्नल, सांघवी स्क्वेअर, पार्श्वनाथ चौक, श्रैयस टॉकीज, सीआयडी ऑफिस, हवेली ब्रीज असा मोदींचा रोड-शो होणार आहे. भाजपच्या मुंबईच्या उमेदवारांसाठी हा रोड-शो असेल. या रोड-शोच्या माध्यमातून भाजपकडून प्रचंड शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.