PM Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या या दौऱ्यात नौदल डॉकयार्ड येथे तीन प्रमुख नौदल युद्धनौका INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाघशीर राष्ट्राला समर्पित करण्यात आले. तसेच इस्कॉन मंदिराचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी महायुतीच्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातून १० आमदारांनी दांडी मारली. त्याची चर्चा रंगली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात आले होते. त्यानंतर आता दुसऱ्यांदा मुंबई दौऱ्यावर आले आहेत. नौदल गौदीमध्ये तिन्ही युद्धनौका राष्ट्राला समर्पित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीलमधील तिन्ही पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार उपस्थित होते. यावेळी सर्व आमदारांना नरेंद्र मोदी यांनी विकासाचा कानमंत्र दिला. परंतु या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, सरोज अहिरे, राजू नवघरे, धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, इद्रीस नाईकवडी उपस्थित नव्हते.
बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमदारांना काय सांगितले? त्याबाबतची माहिती देताना शिवसेना आमदार दीपक केसरकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय जीवनात तुम्ही कसे काम करावे लोकांच्या प्रश्नांना कसे सोडवावे? याबाबत मार्गदर्शन केले. त्यांचे अनुभव शेअर केले. बैठकीत त्यांनी कोणतेही खडे बोल सुनावले नाहीत. त्यांनी सर्वाचे प्रबोधन केले. त्यांच्यासोबत सखोल चर्चा झाली. ते विरोधकांबाबत काही बोलले नाहीत, असे केसरकर यांनी म्हटले.
बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा आमदार आले नाही? या प्रश्नावर बोलताना दीपक केसरकर म्हणाले, कोणी आले किंवा नाहीत त्यांच्यावर आता बोलणे योग्य नाही, असे सांगत त्यांनी या विषयावर बोलणे टाळले. परंतु एकाच पक्षातील दहा आमदार बैठकीत का आले नाही? छगन भुजबळ यांच्यासारखे ज्येष्ठ आमदार का आले नाही? त्याची चर्चा सुरु झाली आहे.