मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बांगलादेशी घुसखोरांविरोधात शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत विरार, बोरीवली आणि नालासोपाऱ्यातील अनेक बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, बांगलादेशी घुसखोरांविरोधातील या मोहिमेवरुन पोलिसांनी मनसेच्या विभाग प्रमुख प्रकाश कुलापकर यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये बांगलादेशी घुसखोरांना पकडण्याबाबत पोलिसांनी मनसेच्या विभाग प्रमुखांना जाब विचारला आहे (Police Noticed to MNS party workers).
पोलिसांकडून नोटीस जारी केल्यामुळे मनसैनिक नाराज झाले आहेत. मनसेचे विभागीय उपाध्यक्ष नयन कदम यांनी याप्रकरणी सरकारवर टीका केली आहे. “हे सरकार मुगलांचे सरकार आहे. त्यामुळे नोटीस पाठवण्यात आली आहे. आम्ही कोणत्याही प्रकारे कायदा हाती घेतलेला नाही. आम्ही पोलिसांच्या मदतीनेच बांगलादेशी नागरिकांना शोधले. पोलिसांनी त्यांचे सर्व कागदपत्र चेक केले”, असे नयन कदम म्हणाले.
“पोलिसांची नोटीस आल्यानंतरही आम्ही मागे हटणार नाहीत. बांगलादेशी घुसखोरांविरोधात आमची मोहिम सुरु राहिल. आम्हाला राज ठाकरे यांचा आदेश आहे”, असं देखील नयन कदम यांनी सांगितले (Police Noticed to MNS party workers).
बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. घुसखोरांना देशाबाहेर पाठवा, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. घुसखोरांविरोधात मनसेने मुंबईत 9 फेब्रुवारी 2020 रोजी मोर्चादेखील काढला होता. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांकडून बोरीवली, विरार, नालासोपारा आणि ठाण्यात बांगलादेशी नागरिकांची शोध मोहिम सुरु करण्यात आली.
मनसेची विरार-बोरीवलीनंतर ठाण्यात धाड
बोरीवली पूर्व चिकूवाडी परिसरात बांगलादेशी घुसखोरांविरोधात मनसेने 13 फेब्रुवारीला सकाळी आंदोलन केलं होतं. या भागात अनेक दिवसांपासून काही बांगलादेशी महिला आणि पुरुष राहत असल्याचा स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांचा दावा होता. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चिकूवाडीतील झोपडपट्टी परिसरात शोध मोहीम राबवत लोकांची चौकशी केली. त्यांची कागदपत्रंही तपासली. त्यांचा पेहराव आणि बोलीभाषा बांगलादेशींसारखी असल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
आंदोलनादरम्यान स्थानिक बोरीवली पोलीस ठाण्याचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले होते. त्या वस्तीत राहणाऱ्या लोकांकडे आधारकार्ड आणि मतदार ओळखपत्र आढळलं. पण, त्यांची मजूर म्हणून स्थानिक पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद नाही. तर कामाच्या शोधात कोलकाता, ओदिशामधून मुंबईत आल्याचा इथल्या लोकांचा दावा आहे. मोलमजुरी करुन दिवसाकाठी त्यांना 350 ते 400 रुपये मजुरी मिळते. पोलिसांना यात काही बालमजूरही आढळले. मनसेकडून विरार-बोरीवलीनंतर ठाण्यातही घुसखोरांविरोधात मोहिम राबविली गेली होती.