मुंबई : मॉडेल उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन वाद निर्माण झाला असताना आता, अभिनेत्री केतकी चितळेच्या एका व्हिडीओवरुन आणखी भर पडलीय. आणि त्यावरुनही राजकीय पडसादही सुरु झालेत. थर्टी फर्स्टला शुभेच्छा देताना हातात दारु किंवा वाईनचा ग्लास घेऊन केतकीनं, वादग्रस्त पोस्ट केलीय. आणि हा व्हिडीओ फेसबूकवर पोस्ट करताना, केतकीनं म्हटलंय की, फादर, त्यांना माफ करा. कारण त्यांना माहित नाही ते काय करतायत. मी काही चुकीचं बोलत असेल तर नक्कीच मला सांगा. मैं कट्टर सनातन हिन्दू हूँ. लेकिन इसका मतलब यह नहीं की बाकी सब 100% गलत है. माझा तिरस्कार करणाऱ्या सगळ्यांना माफ करा.
यानंतर प्रितम नावाच्या एका व्यक्तीनं केतकीला सवाल केलाय. वाह दीदी, लोकांना सांगायचं इंग्रजी परंपरा पाळू नका आणि आपण ढोसायचं. त्यानंतर केतकीनं यावर रिप्लाय केला.
मी कधी म्हणाले इंग्रजी परंपरा पाळू नका ?. सोमरस म्हणजे वाईन. सनातन धर्मात दारु आहे. आमचे देवही दारु पितात. काली मातेला तर दारुचे नैवेद्य असते. तसेच काही शंकराच्या मंदिरातही. स्वत:ची संस्कृती शिका, हे मी नेहमी लिहिते व सांगते. फरक शिका, असा रिप्लाय केतकी चितळेने दिला.
तर इकडे उर्फी जावेदनं पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचलंय. जर मी भाजपमध्ये प्रवेश केला तर चित्रा वाघ यांच्याशी घट्ट मैत्री होईल. चित्राजी, संजय राठोड प्रकरण आठवा. तुम्ही भाजपमध्ये येताच त्यांच्याशी चांगली मैत्री झाली. त्यांच्या सर्व चुका विसरलात. राष्ट्रवादीत असताना एवढा हल्लाबोल केला होता, असं उर्फी म्हणाली.
विशेष म्हणजे, चित्रा वाघांनी थोबाड रंगवण्याची भाषा केल्यानंतर, उर्फी हे ट्विट केलंय. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनीही, उर्फी जावेदचा समाचार घेतलाय. व्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर असल्याची टीका पेडणेकरांनी केलाय.
सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घालून अंगप्रदर्शन करत असल्याचा आरोप उर्फी जावेदवर आहे. चित्रा वाघ यांनी पोलिसात रितसर तक्रार देऊन, कारवाईची मागणीही केलीय.
चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर पोलीस खरंच कारवाई करतात का? हे कळेल. पण वाघ यांनी टार्गेट केल्यानंतर, उर्फी जावेदनंही चित्रा वाघ यांना डिवचणं सुरुच ठेवलंय.