पूजा चव्हाणप्रकरणाची सीबीआय चौकशी करा; वाचा दिवसभरात कोण कोण काय म्हणालं?

| Updated on: Feb 14, 2021 | 2:22 PM

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. (political reactions on Pooja Chavan Suicide Case)

पूजा चव्हाणप्रकरणाची सीबीआय चौकशी करा; वाचा दिवसभरात कोण कोण काय म्हणालं?
Follow us on

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांच्या या स्पष्टीकरणानंतरही पूजा चव्हाण प्रकरणी प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणात पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप करण्यापासून ते या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यापर्यंतच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. (political reactions on Pooja Chavan Suicide Case)

सीबीआय चौकशी करा: देवीदास राठोड

पूजा चव्हाणच्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करावी, अशी मागणी बंजारा नेते देवीदास राठोड यांनी केली आहे. या प्रकरणातील ऑडिओ क्लिप्स आणि इतर उपलब्ध साक्षी पुराव्याची सखोल चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल, असेही राठोड म्हणाले. देवीदास राठोड हे बंजारा समाजातील एक महत्वाचे नेते म्हणून राज्यात परिचित आहेत. त्यांनी सीबीआयची चौकशी मागणी लावून धरणार असल्याचे स्पष्ट केलंय. त्याशिवाय यातील सत्य बाहेर येणार नाही, असंही ते म्हणाले.

दोषींवर कारवाई करणार: रोहित पवार

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात जो जबाबदार असणार त्यावर कारवाई करण्यात येईल. मात्र या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. चौकशीनंतरच कारवाई करता येईल. त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे, असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंना गांभीर्य लक्षात आलेलं नाही: फडणवीस

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलिसांची कारवाई दबावात होत असल्याचं स्पष्ट दिसतंय. पोलीस जोपर्यंत कारवाई करत नाहीत तोपर्यंत त्यांना खुलं मैदान आहे. पोलिसांवरील दबाव नाहीसा झाला पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्य ऐकून त्यांनी या प्रकरणाची माहिती नीट घेतली नसल्याचं वाटतं. उद्धव ठाकरेंना गांभीर्य लक्षात आलेलं नाही, त्यांनी याप्रकरणाला गांभीर्यानं घेतलेले दिसत नाही. त्यांनी या प्रकरणाची नीट माहिती घ्यावी, क्लीप्स नीट ऐकाव्या यावरून कुणाचं आयुष्य उद्धवस्त झालंय ते कळेल, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

मुख्यमंत्र्यांनी त्या क्लिप ऐकाव्या: येरावार

पूजाने आत्महत्या केल्यानंतर तिचा फोन आणि लॅपटॉप घेण्यासाठी मंत्र्याकडून प्रयत्न केला जात असल्याचं ऑडिओ क्लिपमधून स्पष्ट होतं. या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये काय दडलंय हे स्पष्ट झालं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांना या प्रकरणाचा खोलात जाऊन चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी माजी मंत्री मदन येरावार यांनी केली आहे. एखाद्या मंत्र्यावर आरोप होत असतील तर त्या मंत्र्यांनी समोर येऊन उत्तर द्यायला हवं. आठ दिवस होऊनही ऑडिओ क्लिप असतानाही चौकशी होत नाही, याला काय म्हणायचं? मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या ऑडिओ क्लिप ऐकल्या पाहिजे. यातील संभाषण राठोड यांच्या आवाजातील असल्याचं स्पष्ट होत असल्याने संशय निर्माण होत आहे, असं सांगतानाच या प्रकरणी जनतेत मोठा रोष आहे. या संदर्भात आम्ही आंदोलन करू शकतो, असा इशाराही येरावार यांनी केला आहे.

पोलिसांवर दबाव नाही: थोरात

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज नागपूरमध्ये आले होते. यावेळी त्यांचं पूजा चव्हाण प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांकडे लक्ष वेधण्यात आलं. त्यावर थोरात यांनी फडणवीसांचे आरोप फेटाळून लावले. पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाची चौकशी होईल आणि सत्य बाहेर येईल असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. पोलीस दबावात काम करतात अशी पद्धतच नाही. कोणताही पोलीस दबावाखाली काम करत नाही, असं थोरात म्हणाले.

मुख्यमंत्री कुणालाही पाठिशी घालणार नाही: राऊत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची योग्य चौकशी होईल. यात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. चौकशीतून सत्य समोर येईल. मुख्यमंत्री कुणालाही पाठिशी घालणार नाहीत, असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडलं. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. मंत्री संजय राठोड यांचं नाव या प्रकरणी चर्चेत आहे. चौकशीतून सत्य बाहेर येईल. राजकारणात एखाद्याचा बळी घ्यायचा, त्याची बदनामी करायची, चारित्र्यहनन करायचे, असे प्रकार वाढले आहेत, संजय राठोड हे अनेक वर्ष राजकारणात आहेत. राठोड हे विदर्भातील शिवसेनेचा आधारस्तंभ आहेत, त्यांच्या समाजातील सर्वोच्च नेते आहेत, असं राऊत म्हणाले. (political reactions on Pooja Chavan Suicide Case)

बंजारा समाजाची बैठक

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात बंजारा समाजाचे नेते वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्याने बंजारा समाजाची बदनामी होत आहे. यामुळे देशभरातील समस्त बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी संस्थानच्या महंताची आज 12 वाजता पोहरादेवी इथं बैठक सुरू झाली. या बैठकीला तीन मठातील महाराज उपस्थित आहेत. बैठकीला रामराम महाराजचे उत्तराधिकारी बाबूसिंग महाराज, सुनील महाराज, शेखर महाराज, जितेंद्र महाराज, कबीरदास महाराज, महाराष्ट्र अखिल भारतीय बंजारा समाजाचे अध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड, राजेश चव्हाण, निलेश राठोड, महेश चव्हाण, विकास राठोड, संजय चव्हाण, वसंत राठोड. गोर सेवा अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव आदी उपस्थित आहेत. बैठकीत पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. (political reactions on Pooja Chavan Suicide Case)

 

संबंधित बातम्या:

पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांवर दबाव नाही; थोरातांनी फडणवीसांचे आरोप फेटाळले

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

… तर प्रत्येक जिल्ह्यात गुन्हे दाखल करू; अरुण राठोडच्या गावातील गावकऱ्यांचा इशारा

(political reactions on Pooja Chavan Suicide Case)