मुंबई (गिरीश गायकवाड) | महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज कधीही उर्वरित 28 लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवार यादी जाहीर होऊ शकते. भाजपाने दुसरी उमेदवार यादी जाहीर करताना महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची घोषणा केली होती. पण महायुतीमध्ये असलेल्या शिंदे गट आणि अजित पवार गटाने अद्यापही जागा जाहीर केलेल्या नाहीत. कारण काही जागांवरुन महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे जागा वाटप रखडल आहे. पण आज जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत आहेत. तिथे त्यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक सुरु आहे. मनसे सुद्धा महायुतीचा भाग बनू शकते. मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर अजित पवार आले आहेत. तिथे भाजपा नेते आणि अजित पवारांमध्ये चर्चा सुरु आहेत. एकूणच आज प्रचंड राजकीय घडामोडींचा दिवस असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस 8 जागा लढण्यावर ठाम आहे. जागेची अदलाबदल करा दादांचा बैठकीत आग्रह. जागांची अदलाबदल न केल्यास महायुतीच तसच पक्षाचंही नुकसान होईल अशी अजित पवारांनी बैठकीत खंत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती. अजित पवार गटाला कमी जागा मिळतील अशी चर्चा आहे. पण भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमधील घटक पक्षांना सन्मानजनक जागा देऊ असं सांगितलं आहे. मनसेला युतीमध्ये घेण्यासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली.
बैठकीत एकनाथ शिंदे काय बोलणार?
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी सुद्धा घडामोडी घडत आहेत. शिवसेना लोकसभा गट नेते आणि खासदार राहूल शेवाळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी ठाणे येथील निवासस्थानी पोहचलेत. राहुल शेवाळे यांच्या सोबत शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने, भावना गवळी, धैर्यशिल माने, श्रीरंग बारणे, सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे देखील उपस्थित आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उमेदवारांची यादी पुढील 24 तासात जाहीर होणार असल्याची माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. शिवसेना खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलंय.