मुंबई: टाटा ग्रीड फेल्यूअर (Tata Grid failure) झाल्याने दक्षिण मुंबईत (south Mumbai) वीज पुरवठा (Power outage) खंडित झाला. कुलाबापासून ते कुर्ल्यापर्यंत आणि चर्चगेटपासून ते विरारपर्यंत वीज पुरवठा अचानक खंडित झाल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. बत्तीगुल झाल्यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनसही अंधारात गेले होते. वीज पुरठा खंडित होण्याचा सर्वाधिक फटका फोर्ट परिसर, दादर, माटुंगा, भायखळा, शीव, परळ, वरळी आणि प्रभादेवी परिसराला बसला होता. त्यामुळे अनेकांनी बेस्ट प्रशासनाच्या कार्यालयात फोन करून वीज पुरवठा खंडित झाल्याबाबतच्या तक्रारी करतानाच हा पुरवठा कधी सुरू होणार अशी विचारणाही केली. तसेच वीज नसल्याने मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेचाही खोळंबा झाला. मात्र, आज रविवारचा दिवस असल्याने चाकरमान्यांची गैरसोय झाली नाही. तब्बल तासाभराच्या खोळंब्यानंतर वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. त्यामुळे दक्षिण मुंबईतील रहिवाश्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
आज सकाळी टाटा पॉवर सप्लायमध्ये बिघाड झाल्याने सकाळी 9:50 ते 10:53 पर्यंत वीज पुरवठा खंडित झाला होता. टाटा ग्रीड फेल्युअर गेल्याने हा वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे मुंबईपासून ते ट्रॉम्बेपर्यंतचा वीज पुरवठा खंडित झाला होता. तर इकडे चर्चगेटपासून ते विलेपार्लेपर्यंतचा संपूर्ण परिसर अंधारात गेला होता. आज रविवार असल्याने फोर्ट परिसर, माटुंगा, दादर आणि सायन परिसरात आज कार्यालये सुरू नव्हती. त्यामुळे चाकरमान्यांना त्याचा फटका बसला नाही. कामाच्या दिवशी हा वीज पुरवठा खंडित झाला असता तर कार्यालयातील कामे ठप्प झाली असती. बँकांनाही त्याचा फटका बसला असता. बँकांचे व्यवहारही ठप्प झाले असते.
अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने छत्रपती शिवाजी टर्मिनसही अंधारात गेले होते. संपूर्ण रेल्वेस्थानकात अंधारा झाला होता. मात्र, रविवार सुट्टीमुळे स्थानकात गर्दी नव्हती. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. वीज पुरवठा खंडित होण्याचा रेल्वे सेवेवरही परिणाम झाला. पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असल्याने नागरिकांना त्याचा अधिक फटका बसला नाही. तसेच सुट्टीचा दिवस असल्याने कोणतीही गैरसोय झाली नाही. पश्चिम मार्गावरील रहिवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून जोगेश्वरी उपकेंद्रातून वीजपुरवठा वाढविण्यात आला होता. दरम्यान, तासाभराच्या प्रयत्नानंतर वीज पुरवठा पूर्ववत सुरू झाला. तसेच ओव्हरहेड वायरवरील वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.
संबंधित बातम्या:
महाराष्ट्रातच इन्कम आणि टॅक्स आहे काय?; संजय राऊतांचा भाजपला सवाल
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा नागपूर कट्टा, बॉटनिकल गार्डनसाठी शोधताहेत फूलं!