पुरेसा कोटा असूनही विजयासाठी संघर्ष, अखेर काँग्रेससाठी गोड बातमी, विधान परिषदेचा निकाल समोर

| Updated on: Jul 12, 2024 | 6:43 PM

विधान परिषद निवडणुकीचा निकाल आता समोर येत आहे. काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांचा विजय झाला आहे. काँग्रेसने या निवडणुकीत 1 उमेदवार दिला होता. हा उमेदवार जिंकण्यासाठी 23 मतांची आवश्यकता होती. पण काँग्रेसकडे हक्काची 38 मते होती. त्यामुळे या निवडणुकीत प्रज्ञा सातव यांचा विजय झाला आहे.

पुरेसा कोटा असूनही विजयासाठी संघर्ष, अखेर काँग्रेससाठी गोड बातमी, विधान परिषदेचा निकाल समोर
प्रज्ञा सातव
Follow us on

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडलं. या निवडणुकीत महायुतीकडून 12 उमेदवार रिंगणात असल्याने चुरस वाढली होती. अखेर या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. या निवडणुकीत 100 टक्के मतदान पार पडलं आहे. राज्यातील सर्व 274 आमदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. यानंतर आता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मतमोजणीतून विधान परिषद निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या एकमेव उमेदवार प्रज्ञा सातव यांचा विजय झाला आहे. विशेष म्हणजे मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव या आघाडीवर होत्या. पण नंतर अचानक भाजप उमेदवार आघाडीवर असल्याची बातमी आली. यानंतर अखेर प्रज्ञा सातव यांनी 23 मतांचा कोटा पूर्ण केला आहे. प्रज्ञा सातव यांचा विजय झाला आहे.

या निवडणुकीत काँग्रेसने केवळ 1 उमेदवार दिला होता. विजयासाठी 23 मतांची आवश्यकता होती. पण काँग्रेसकडे 38 हक्काची मते होती. त्यामुळे प्रज्ञा सातव या सहज जिंकून आल्या आहेत. प्रज्ञा सातव या काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव हे काँग्रेसमधील मोठे नेते होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ते निकटवर्तीय होते. तसेच राजीव सातीव यांचे गांधी कुटुंबासोबत घनिष्ट संबंध होते. पण तीन वर्षांपूर्वी राजीव सातव यांचं निधन झालं होतं. राजीव सातव यांच्या निधन नंतर प्रज्ञा सातव यांची नोव्हेंबर 2021 मध्ये विधान परिषदेत बिनविरोध निवड करण्यात आली होती. यानंतर त्यांना काँग्रेसकडून यावर्षीदेखील विधान परिषदेची संधी देण्यात आली.

निवडणुकीत कोणकोण आघाडीवर होतं?

निवडणुकीच्या मतमोजणीपासून प्रज्ञा सातव या सुरुवातीला आघाडीवर होत्या. त्यांच्यासोबतच ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर हे आघाडीवर होते. यानंतर शिवसेनेचे कृपात तुमाने हे आघाडीवर आले. यानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार आघाडीवर होते. याशिवाय भाजपचे सर्व उमेदवार आघाडीवर दिसले. दुसरीकडे भाजप पुरस्कृत सदाभाऊ खोत हे सुरुवातीला पिछाडीवर दिसले. पण नंतर त्यांनी चांगलीच आघाडी घेतली. तर राष्ट्रवादी शरद पवार गट पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील हे पिछाडीवर बघायला मिळाले. यानंतर अचानक आकडे बदलायला लागले आणि भाजपच्या उमेदवारांचा विजय घोषित व्हायला लागला. यानंतर काही वेळाने प्रज्ञा सातव यांचादेखील विजय झाल्याची माहिती समोर आली.

कोणकोण जिंकलं?

या निवडणुकीचा पहिला निकाल हा भाजपच्या बाजूने लागला. भाजपचे योगेश टिळेकर यांचा विजय झाला. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचादेखील विजय झाला आहे. योगेश टिळेकर यांच्यानंतर पंकजा मुंडे या दुसऱ्या विजयी ठरल्या. त्यानंतर भाजपचेच उमेदवार परिणय फुके हे विजयी झाल्याची तिसरी बातमी आली. या निवडणुकीत भाजपचे चारही उमेदवार जिंकून आले आहेत. तर भाजप पुरस्कृत उमेदवार सदाभाऊ खोत यांचा निकाल रखडला होता. अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार जिंकले आहेत. ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांचाही विजय जवळपास निश्चित आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्यात चुरस रंगल्याचं बघायला मिळालं. पण अखेर सदाभाऊ खोत यांचा विजय समोर आला. त्यामुळे शरद पवार गटाच्या उमेदवाराता पराभव झाल्याचं स्पष्ट झालं.

विधान परिषदेतील भाजपचे उमेदवार

  • 1) पंकजा मुंडे
  • 2) परिणय फुके
  • 3) सदाभाऊ खोत
  • 4) अमित गोरखे
  • 5) योगेश टिळेकर

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

  • 1) शिवाजीराव गर्जे
  • 2) राजेश विटेकर

शिवसेना

  • 1) कृपाल तुमाने
  • 2) भावना गवळी

शिवसेना ठाकरे गट

  • 1) मिलिंद नार्वेकर

शरद पवार गट पुरस्कृत उमेदवार

  • 1) जयंत पाटील (शेकाप)

काँग्रेस

  • 1) प्रज्ञा सातव