Praful Patel | सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर प्रफुल्ल पटेल यांचं सर्वात मोठं वक्तव्य, खरं-खोटं काय?

| Updated on: Oct 13, 2023 | 3:17 PM

आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. या सुनावणीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठं वक्तव्य केलं.

Praful Patel | सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर प्रफुल्ल पटेल यांचं सर्वात मोठं वक्तव्य, खरं-खोटं काय?
Follow us on

मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्षांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर आज सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे ओढले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून आमचे आदेश पाळले जात नाहीत, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. आमदार अपात्रतेच्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी मंगळवारपर्यंत वेळापत्रक जाहीर करा. अन्यथा आम्ही आदेश देऊ, अशी कानउघाडणी सुप्रीम कोर्टाने केली आहे. पुढच्या निवडणुकांधी निर्णय घ्यायला हवा. विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला नाही तर 2 महिन्यात निर्णय घेण्याचा आदेश देऊ, असंही कोर्टाने म्हटलं आहे.

सुप्रीम कोर्टात आज पार पडलेल्या सुनावणीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी महत्त्वाची टिप्पणी केली. “राष्ट्रवादीची याचिका 16 नंबरची होती. तर शिवसेनेची याचिका 19 नंबरची होती. आमच्या याचिकेवर सुनावणी घेतली गेलीच नाही. येत्या मंगळवारी आमच्या प्रकरणावर सुनावणी घेतली जाण्याची शक्यता आहे. आमचे वकील मुकूल रोहतगी तिथे हजर होते. पण आमच्या याचिकेवर सुनावणी पार पडली नाही”, असा मोठा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला.

प्रफुल्ल पटेल नेमकं काय म्हणाले?

“कोर्टात जो काही युक्तिवाद झाला तो फक्त शिवसेना प्रकरणाबद्दल आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रकरणातील काही गोष्टी वेगळ्या आहेत. शिवसेना प्रकरणातील फॅक्ट्स आणि सर्कमस्टन्सेस वेगळे आहेत. त्यामुळे दोन्ही प्रकरणाला एकसारखं समजून घेणं योग्य नाही. काही जण बाहेर येवून दोन्ही प्रकरणांची सुनावणी एकत्र झाली आहे, असं बोलत आहेत, पण तसं अजिबात झालेलं नाही”, असं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं.

“कुणी कोर्टात गेले तरी आम्हाला अजून नोटीस दिलेली नाही. आमच्या प्रकरणावर मंगळवारी सुनावणी होईल. ज्या प्रकरणावर सुनावणी झाली त्यावर मला बोलण्याचा अधिकार नाही. कारण ते प्रकरण दुसऱ्या पक्षाचं आहे”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. दरम्यान,  आता या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या मंगळवारी 17 ऑक्टोबरला होणार आहे. त्याआधी विधानसभा अध्यक्ष सुनावणीचं वेळापत्रक जाहीर करतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रफुल्ल पटेल यांचा दावा खोडून काढलाय. सुप्रीम कोर्टानेच दोन्ही पक्षांचं प्रकरण एकत्र घेण्याचं म्हटलं आहे, असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिलं.