मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी 2 जुलैला रविवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी 8 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार हे विधानसभेत विरोधी बाकांवर बसणाऱ्या पक्षांचे प्रमुख नेते होते. त्यामुळे त्यांनी सत्तेत आल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आल्याचं मानलं जात आहे. अजित पवार यांच्या शपथविधीनंतर आता अनेक घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटाचं समर्थन केलेलं नाही. त्यामुळे दोन्ही गटाकूडन आपणच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा दावा केला जातोय. पण अजित पवार हेच मुख्य नेते आहेत, असा दावा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. यासाठी त्यांनी शपथविधीच्या दोन दिवस आधी घडलेल्या घडामोडींचा दाखला दिला.
“30 जून 2023 या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक महत्त्वाची बैठक झाली. त्या बैठकीला अनेक लोकं उपस्थित होते. ती बैठक अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ या निवासस्थानी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खूप सारे आमदार तिथे उपस्थित होते. दोन्ही सदनाचे आमदार उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुतांश पदाधिकारी, कार्यकर्ते होते. त्या 30 तारखेच्या बैठकीत सर्वांनी सर्वानुमते अजित पवार यांना आपला नेता म्हणून निवडलं. त्यामुळे अजित पवार यांनी दोन-तीन प्रक्रिया नंतर केली”, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
“अजित पवार यांनी पहिली गोष्ट ही केली की प्रफुल्ल पटेल म्हणजे माझी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांना पत्राद्वारे सूचित केलं की, अजित पवार आमचे विधीमंडळाचे नेते आहेत. आम्ही पक्ष म्हणून अनिल भायदास पाटील यांना प्रतोद म्हणून माझ्या सहीद्वारे नियुक्त केलं”, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.
“त्याचवेळी आम्ही विधान परिषदेचे सभापतींनाही कळवलं की, अमोल मिटकरी हे आमचे विधान परिषदेचे प्रतोद म्हणून नियुक्त करत आहोत. महत्त्वाचं म्हणजे आम्ही त्याच दिवशी 30 तारखेला बहुतांश आमदारांचे प्रतिज्ञापत्रांसह निवडणूक आयोगाला आमची याचिका अजित पवार यांच्या नावाने दाखल केली आहे. 30 तारखेपासून हा विषय निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या पटलावर पोहोचला आहे”, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.
“आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत म्हणून चिन्ह आणि इतर गोष्टी आम्हाला थेट मिळायला पाहिजेत, असं आम्ही निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. कृपया करुन आपल्या सर्वांना मी कळवू इच्छितो की, हे स्प्लिट नाही किंवा वेगळा गट नाही. हा सरळसरळ पक्षाचा बहुमत अजित पवार यांच्या पाठीमागे उभी आहे, असं आम्ही निवडणूक आयोगाकडे याचिकाद्वारे सांगितलं आहे”, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.