’27 नको, 28 तारीख ठेवा’, प्रकाश आंबेडकर यांचं मविआ नेत्यांना आवाहन

| Updated on: Feb 26, 2024 | 5:42 PM

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची उद्या जागावाटपाबाबत महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. ही बैठक 27 ऐवजी 28 फेब्रुवारीला घ्या, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं.

27 नको, 28 तारीख ठेवा, प्रकाश आंबेडकर यांचं मविआ नेत्यांना आवाहन
Prakash Ambedkar
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

मुंबई | 26 फेब्रुवाराी 2024 : महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी 27 फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली आहे. या बैठकीत जाण्यासाठी प्रकाश आंबेडकर देखील तयार आहे. मात्र, 27 तारखेला पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या होणाऱ्या सत्ता परिवर्तन महासभेमुळे बैठकीला जाणं शक्य नसल्याचं त्यांनी ट्विटरवरुन (X) माध्यमांना सांगितलं आहे. तसेच, जर तारीख 27 ऐवजी 28 होणार असेल तर आम्ही येऊ, असेही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कळवलं आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा काल फोन आला आणि त्यांनी 27 फेब्रुवारीच्या बैठकीची माहिती दिली. आम्ही त्यांना सांगितले की, 27 तारखेला आम्ही येऊ शकत नाही. पुण्याला वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा आहे. महाराष्ट्राची पूर्ण राज्य कमिटी यावेळी पुण्यात असणार आहे. तसेच, जयंत पाटील यांना विनंती केली आहे की, 28 तारखेला शक्य होत असेल तर आपण तेव्हा बैठक ठरवू”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

“जयंत पाटील यांनी याविषयी पक्षातील लोकांशी चर्चा करुन सांगतो म्हटले आहे. मात्र, सकाळी खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये 27 फेब्रुवारीला बैठक असल्याचे सांगितले आहे. पण, आम्ही संजय राऊत यांना सांगतोय, की पुण्यात जाहीर सभा संध्याकाळी असणार आहे. त्यामुळे 27 च्या बैठकीला आमचे जमणार नाही, पण तीच तारीख 28 होणार असेल तर आम्ही येऊ”, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

पुण्यातील ‘वंचित’च्या बॅनरची राज्यात चर्चा

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या मंगळवारी होणाऱ्या सत्ता परिवर्तन महासभेची तयारी जोरात सुरू आहे. पुण्यातील सभेसाठी एका चौकात लागलेल्या मोठ्या बॅनरची सध्या चर्चा होत आहे. हा बॅनर पुण्यातील आत्तापर्यंतचा सर्वांत मोठा बॅनर असल्याचे बोलले जात आहे. पुण्यात मंगळवारी एसएसपीएमएस मैदान, आरटीओ कार्यालयाजवळ सत्ता परिवर्तन महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही सभा होणार आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, ही सभा अजून एका कारणाने चर्चेत येत आहे. या सभेची सध्या जोरात तयारी सुरू आहे. शहरात सभेचे बॅनर्स पाहायला मिळत आहेत. मात्र, पुण्याच्या इतिहासातील आत्तापर्यंतचा सर्वांत मोठा बॅनर आरटीओ चौकात लागल्याने बॅनरची चर्चा सर्वाधिक होत आहे.

सत्ता परिवर्तन महासभेला पुण्यातील नागरिक येणार आहेत. मात्र, पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरातूनही लोक येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, सभेला दीड लाख ते दोन लाखांहून अधिक जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. या सभेला राज्याची पूर्ण कार्यकारणी उपस्थित राहणार असून, ही सभा राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ करणार असल्याचा दावा केला जातोय. तसेच, महाराष्ट्रात पुढील राजकारणाची दिशा देखील या सभेमुळेच ठरणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

पुण्यातील सत्ता परिवर्तन महासभेची तयारी जोरात सुरू असून, आता स्टेजचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. यासाठी कार्यकर्ते दिवसरात्र झटत आहेत. त्यामुळे आम्हाला आशा आहे की, उद्याची सभा यशस्वीरित्या पार पडणार आहे. आमच्या आत्तापर्यंत ज्या सभा झाल्या त्या सर्वच जोरात झाल्या. त्यामुळे पुण्याच्या या सभेला मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष मुन्नवर कुरेशी यांनी व्यक्त केली.