राजकीय गुंता वाढला, ‘प्रकाश आंबेडकर यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा विरोध’, ठाकरे गट कुणासोबत जाणार?

| Updated on: Jan 03, 2023 | 7:51 PM

"मुंबई महापालिकेत 83 जागा लढण्यासाठी आम्ही तयार होतो. पण युतीसाठी आम्हाला काँग्रेसचा छुपा तर राष्ट्रवादीचा थेट विरोध आहे", असं धक्कादायक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलंय.

राजकीय गुंता वाढला, प्रकाश आंबेडकर यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा विरोध, ठाकरे गट कुणासोबत जाणार?
Follow us on

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवं समीकरण निर्माण झालंय. पण हे समीकरण प्रत्यक्षात कसं असणार? आगामी निवडणुकांमध्ये हे समीकरण नेमकं कसं राबवलं जाणार? याकडे अनेकांना उत्सुकता आहे. कारण शिवसेनेचा ठाकरे गट सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन मित्रपक्षांसोबत काम करत आहे. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासोबत अडीच वर्षे सत्तेतही होती. पण सत्तेतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेचा ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील संबंध वाढले आहेत. त्यामुळे शिवशक्ती आणि भीमशक्ती एक झाल्याची चर्चा होती. पण ठाकरे आणि आंबेडकर यांची ही युती काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मान्य आहे का? हा प्रश्नच आहे. कारण प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत एक धक्कादायक विधान केल्याने राजकीय गुंता आणखी वाढलाय.

“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गट सोडेल तेवढ्या जागा लढणार”, असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

“मुंबई महापालिकेत 83 जागा लढण्यासाठी आम्ही तयार होतो. पण युतीसाठी आम्हाला काँग्रेसचा छुपा तर राष्ट्रवादीचा थेट विरोध आहे”, असं धक्कादायक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलंय.

हे सुद्धा वाचा

“आम्ही शिवसेनेला सांगितलं तुम्ही जेवढ्या जागा सोडाल तेवढ्या जागांवर आम्ही निवडणूक लढवू”, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

“आम्ही चर्चेपूर्वी मुंबई महापालिका निवडणुकीत 83 जागांची तयारी केली होती. महाविकास आघाडी असताना आम्ही 83 जागांवर तयारी करण्याचं ठरवलं होतं”, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसची नेमकी भूमिका काय?

वंचित बहुजन आघाडीमुळे विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांना फटका बसला होता. त्यामुळे वंचित आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात मनभेद असू शकतात. पण उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचा आपल्याला थेट विरोध असल्याचं विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.