गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 21 ऑक्टोबर 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी आणि राज्याचं राजकारण ढवळून निघणारी मोठी बातमी आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात भेट झाली आहे. या दोन्ही नेत्यांनी चाय पे चर्चा केलीय. स्वत: खासदार सुप्रिया सुळे यांनी आंबेडकर यांची शरद पवार यांच्याशी भेट घडवून आणली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. प्रकाश आंबेडकर हे इंडिया आणि महाविकास आघाडीत येण्याची शक्यताही या भेटीने वर्तवली जात आहे.
मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यातील एका परिसंवादात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर, खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना पाचारण करण्यात आले होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी प्रकाश आंबेडकर यांची शरद पवार यांच्यासोबत भेट घडवून आणली.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पाचव्या मजल्यावर ही भेट झाली. यावेळी फक्त शरद पवार, सुप्रिया सुळे आणि प्रकाश आंबेडकर होते. या तिन्ही नेत्यांमंध्ये बंददरवाजाआड चर्चा झाली. चहापानाच्या निमित्ताने झालेल्या या बैठकीत आंबेडकर आणि पवार यांच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. तसेच वंचित आघाडीला इंडिया आघाडीत आणि महाविकास आघाडीत घेण्यावर चर्चा झाल्याचंही सांगितलं जात आहे. या भेटीने आंबेडकर आणि पवार यांच्यातील कटुता दूर झाली असल्याचंही सांगितलं जात असून आंबेडकर लवकरच महाविकास आघाडीत दिसतील असं सांगितलं जात आहे. ही चर्चा खेळीमेळीची झाल्याचंही सांगितलं जात आहे.
दरम्यान, भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या भेटीवर भाष्य केलं. काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांना कधीच जवळ केलं नाही. त्यांना कधीच विजयी होऊ दिलं नाही. साथ दिली नाही. प्रकाश आंबेडकरांना पुढे येऊ दिलं नाही. त्यांना सोबत घेतल्याने आंबेडकर यांचं नेतृत्व पुढे येईल याची भीती वाटते. त्यामुळेच ते आंबेडकरांना जवळ घेत नाही. त्यांनी बाबासाहेबांनाही भंडाऱ्यातून विजयी होऊ दिलं नव्हतं, असं बावनकुळे म्हणाले.