मुंबई | 11 फेब्रुवारी 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार हालचाली सुरु आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीत तर सातत्याने बैठकांचं सत्र सुरु आहे. या बैठकांमध्ये जागावाटपाबाबतचा फॉर्म्युला ठरत आहे. या जागावाटपासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथाला यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. पण या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील कोणीही सदस्य नव्हतं. तसेच वंचित बहुजन आघाडीचेदेखील नेते नव्हते. त्यामुळे या भेटीवर प्रकाश आंबेडकर यांना ठाकरेंना उद्देशून प्रश्न उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांना सोबत येण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या मनात नेमकं काय आहे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.
काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथाला आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीमध्ये लोकसभा जागावाटप, तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. मात्र, या बैठकीला वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रतिनिधी हे उपस्थित नव्हते. यावर वंचित बहुजन आघाडीने ट्विटरच्या माध्यमातून सवाल उपस्थित केला आहेत. “देशात आणि महाराष्ट्रात भाजप आणि आरएसएसला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने लवचिक भूमिका घेऊन महाविकास आघाडीसोबत समझौता केलेला आहे. सत्ता परिवर्तनासाठी चर्चा पुढे जात असताना समन्वयाने महत्त्वाचे निर्णय घेण्याची आवश्यकता आहे”, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडली आहे.
वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांना या बैठकीपासून ‘वंचित’ का ठेवलं ? असा सवाल वंचितने उपस्थित केला आहे. दरम्यान, काँग्रेसने २४ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी 23 जागांची मागणी केल्याची बातमी पसरली असून, ही बाब खरी आहे का? अशीही विचारणा वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
“ओबीसी नेत्यांनी राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केलीय. या घोषणेच्या आधी त्यांनी छगन भुजबळ यांचा सल्ला घेतला. ओबीसी पक्ष काढत आहेत ही फार चांगली गोष्ट आहे. छगन भुजबळ यांना माझा सल्ला आहे की, आपण या ओबीसी संघटनेचं नेतृत्व करावं. पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी आम्ही सामाजिक, राजकीय दृष्टीने त्यांना पूर्णपणे मदत करायला तयार आहोत. वंचित बहुजन आघाडीचा सल्ला छगन भुजबळ मान्य करतील, अशी आशा आम्ही बाळगतो”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.