मुंबई | 19 मार्च 2024 : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी, काँग्रेसला नवी ऑफर दिलीय. काँग्रेसला 7 जागांवर आम्ही पाठींबा देऊ, त्या 7 जागांची यादी काँग्रेसनं द्यावी, असं पत्रच आंबेडकरांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंना लिहिलंय. तसेच ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षावरुन आपला विश्वास उडाल्याचंही आंबेडकर म्हणाले आहेत. “लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मात्र महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही चर्चेसाठी किंवा बैठकीसाठी निमंत्रित न करता स्वतंत्र बैठका घेत आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांनी मविआच्या अनेक बैठकांमध्ये वंचितच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेण्यास नकार दिला आहे. आम्हाला दिलेल्या सावत्र वागणुकीमुळे आमचा त्या दोन्ही पक्षांवरचा विश्वास उडाला आहे”, असं प्रकाश आंबेडकर पत्रात म्हणाले आहेत.
फॅसिस्ट, फुटीरतावादी, लोकशाही मूल्ये पायदळी तुडवणाऱ्या भाजपा-संघाच्या सरकारला विरोध करणं हेच वंचित बहुजन आघाडीचं प्रमुख धोरण आहे. त्यासाठीच 7 जागांवर काँग्रेसला पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मी काँग्रेसला विनंती करतो की, महाविकास आघाडीत काँग्रेसला ज्या जागा मिळतील, त्यापैकी तुमच्या पसंतीच्या 7 जागांची यादी आम्हाला द्या. या 7 जागांवर वंचित बहुजन आघाडी तुमच्या उमेदवारांना पाठींबा देईल. हा प्रस्ताव काँग्रेसबद्दल आमची सद्भावना आणि भविष्यातील दोघांच्या आघाडीच्या शक्यतेसाठी आहे, अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात मांडली आहे.
याआधीही खर्गेंना पत्र लिहून काँग्रेस आणि वंचितचं जागा वाटप आपण करु, असं सांगत प्रकाश आंबेडकरांनी वेगळ्या आघाडीची ऑफर दिली होती. आता मविआत काँग्रेसला ज्या जागा मिळतील त्यापैकी 7 जागांवर मदतीचा हात वंचितनं पुढे केलाय. महाविकास आघाडीचं जागा वाटप झालेलं आहे, असं संजय राऊतांनी आधीच क्लिअर केलंय. त्याचवेळी वंचितला 4 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे. त्यावर वंचितनं निर्णय घ्यावा असंही महाविकास आघाडीकडून राऊतांनी स्पष्ट केलं. तर मविआनं 3 जागांचा प्रस्ताव दिला असून तो फेटाळल्याचं आंबेडकर म्हणाले आहेत.
मविआच्या 2 बैठकांमध्ये प्रकाश आंबेडकर हजर राहिले आहेत. मात्र वंचितच्या मागणीप्रमाणं तोडगा निघालेला नाही. शिवाजी पार्कच्या काँग्रेसच्या न्याय यात्रेच्या समारोपीय सभेलाही प्रकाश आंबेडकर हजर होते. आता जागावाटपावरुन वंचितचं जमत नसलं तरी काँग्रेसला 7 जागांवर मदतीची तयारी आंबेडकरांनी दाखवलीय. अर्थात त्याचवेळी युती असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेवरचा विश्वास उडालाय हेही आंबेडकरांनी खर्गेंना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. म्हणजेच सध्याचं चित्र पाहिलं तर वंचित महाविकास आघाडीसोबत राहून निवडणूक लढेल असं दिसत नाही.