‘काँग्रेसने आम्हाला चेपलं; कुणासोबत जायचं ते आता उद्धव ठाकरे यांनी ठरवावं’, शिंदे-फडणवीस यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांची रोखठोक भूमिका

| Updated on: Dec 13, 2022 | 8:53 PM

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपुमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

काँग्रेसने आम्हाला चेपलं; कुणासोबत जायचं ते आता उद्धव ठाकरे यांनी ठरवावं, शिंदे-फडणवीस यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांची रोखठोक भूमिका
Follow us on

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपुमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. या भेटीमागचं खरं कारण वेगळं होतं. पण राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलेलं होतं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राजकीय चर्चांवर आपली रोखठोक भूमिका मांडली.

“कोण-कोणाला भेटलं की त्याला राजकारणाचा वास येतो असं नाही. आपापल्या वैयक्तिक भूमिका सर्वांच्या आहेत”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

“मी 40 वर्षांपासून राजकारणात आहे. काँग्रेसने आम्हाला कायम चेपलं, शिवसेना आता आमच्यासोबत येत आहे. काँग्रेसच्या सोबत कायम भांड्याला भांड लागलं”, असं आबेडकर म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी कोणासोबत जायचं ते त्यांनी ठरवावं, बॉल आता त्यांच्या कोर्टात आहे”, असंही ते यावेळी म्हणाले.

“मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट ही प्रत्येकवेळी राजकीय नसते. असं झालंच तर अनेक जणं घरी बसतील”, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी इंदू मिलबाबत चर्चा करण्यासाठी माझी भेट घेतली होती. या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे इन्स्टिट्यूशन सुरू करण्याची मागणी केली”, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

“काँग्रेस सरकारने ते केलं नाही. आता मुख्यमंत्र्यांसोबत इन्स्टिट्यूशन उभं करण्यासंदर्भात चर्चा झाली. पुतळ्याबाबत काही आक्षेप होते. त्याची कल्पना दिली. त्यासाठी समिती नेमून त्या पुतळ्याची पाहणी ते करतील”, असं आंबेडकरांनी सांगितलं.

…म्हणून प्रकाश आंबेडकर आणि शिंदे-फडणवीसांची बैठक

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याबाबत चर्चा करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मध्यप्रदेश ऐवजी दिल्लीहून बनवून आणण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावली असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याबाबत अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासाठी संबंधित बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.