मनोज जरांगेंना जालना मतदारसंघातून उमेदवारी द्या, ‘वंचित’ची महाविकास आघाडीकडे मागणी

| Updated on: Feb 28, 2024 | 6:15 PM

वंचित बहुजन आघाडीने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना जालनामधून उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी महाविकास आघाडीकडे केली आहे. प्रकाश आंबेडकर यांची ही मागणी महाविकास आघाडी मान्य करते का ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

मनोज जरांगेंना जालना मतदारसंघातून उमेदवारी द्या, वंचितची महाविकास आघाडीकडे मागणी
manoj jarange patil and prakash ambedkar
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

निवृत्ती बाबर, Tv9 प्रतिनिधी, मुंबई | 28 फेब्रुवारी 2024 : महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक पार पडली. लोकसभेच्या जागावाटपाबाबत या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे नेतेदेखील सहभागी झाले. यावेळी वंचित बहुजन आघाडीने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना जालनामधून उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच कोणत्याही पक्षाशी युती नसताना 27 मतदारसंघामधून वंचित बहुजन आघाडीने लढण्याची तयारी केली आहे. ते मतदारसंघ कोणते याची यादी देखील बैठकीत वंचितकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला 4 महत्त्वाचे प्रस्ताव पाठवले आहेत. त्यावर आता महाविकास आघाडीचे नेते काय भूमिका मांडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाविकास आघाडीचा वंचित बहुजन आघाडीला प्रस्ताव काय?

  • “महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉ. अभिजित वैद्य यांना कॉमन कॅण्डीडेट म्हणून जाहीर करावे”
  • “महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत किमान १५ ओबीसी उमेदवार असावेत”
  • “महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षाने असे लेखी वचन दिले पाहिजे की, पक्ष किंवा त्यांचा निवडून आलेला उमेदवार निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर भाजपामध्ये सामील होणार नाही.”
  • “किमान 03 अल्पसंख्यांक उमेदवार असावेत.”

‘त्या जागांवर आम्ही चर्चा करायला तयार’

वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते धैर्यवर्धन पुंडकर यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “आम्ही मागच्या जून-जुलैमध्ये लक्ष केंद्रीत केलेल्या मतदारसंघाची यादी तयार केली होती. ती यादी आम्ही महाविकास आघाडीला दिली आहे. या जागांपैकी काही जागांवर अपवाद सोडून इतर जागांवर आम्ही महाविकास आघाडीसोबत चर्चा करायला तयार आहोत”, असं पुंडकर यांनी सांगितलं.

“यासोबत आम्ही 4 मागण्या अधिकच्या ठेवल्या आहेत. जालना लोकसभा मतघारसंघातून मनोज जरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉ. अभिजीत वैद्य हे महाविकास आघाडीचे सर्वांचे कॉमन उमेदवार असावेत, असा प्रस्ताव दिला. आम्ही एकूण 27 जागांचा प्रस्ताव दिलाय. यापैकी काही जागांचा अपवाद सोडून इतर सर्व जागांवर आम्ही चर्चेला तयार आहोत”, असं धैर्यवर्धन पुंडकर यांनी सांगितलं.