मुंबई | 3 मार्च 2024 : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं घोंगडं अजूनही भिजत आहे. दुसरीकडे भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीरही केली आहे. आघाडीचं मात्र अजून जागा वाटपाची चर्चाच सुरू आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला नाही. प्रकाश आंबेडकर यांना किती जागा द्यायच्या तेही ठरलं नाही. त्यामुळे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीच्या कोणत्याच बैठका आणि कार्यक्रमाला जाऊ नका असं आवाहन वंचितच्या कार्यकर्त्यांना केलं आहे. त्यामुळे आघाडीत खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचं एक मोठं विधान आलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माजी मंत्री शरद पवार यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी वंचितला किती जागा देणार याबाबतची माहिती दिली. वंचित सोबत आल्यास त्यांना चार ते पाच जागा देणं शक्य आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या पाच जागांवर प्रकाश आंबेडकर समाधानी होणार का? प्रकाश आंबेडकर यावर आता आपली काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. वंचितला पाच जागा दिल्यानंतर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं सूत्र कसं राहणार? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
याच अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवार यांनी आणखी एक मोठं विधान केलं आहे. राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर आमच्यासोबत आले तर त्यांना माढाची जागा सोडली जाऊ शकते, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. राज्यात जानकर यांची चांगली ताकद आहे. धनगर समाज जानकर यांच्या बाजूने आहे. जानकर यांचा एक आमदारही आहे. महायुतीत जानकर यांना डावललं गेल्याचं चित्र आहे. महायुतीत जानकर यांना लोकसभेची जागा मिळणार नसल्याचं चित्र असल्यानेच जानकर यांनी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे जानकर यांना सोबत घेण्याची भूमिका शरद पवार यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर जानकर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जानकर महाविकास आघाडीसोबत गेल्यास त्यांचा संसदेत जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असं सूत्रांचं म्हणणं आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या कार्यक्रमांना न जाण्याचा कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे मातोश्रीवर गेले आहेत. मातोश्रीवर जाऊन हे दोन्ही नेते प्रकाश आंबेडकर, जागा वाटप आणि इतर विषयांवर चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. या भेटीत काय निर्णय होतो याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.