मुंबई : “महाराष्ट्रात एकीकडे देवदैवत कुलुपात बंदिस्त आहेत, तर दुसरीकडे डान्स बार खुलेआम सुरू आहेत. ही सरकारसाठी शरम आणणारी गोष्ट आहे. राज्य सरकारचा ढोंगीपणा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेसमोर आला आहे,” अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलीय. ठाण्यातल्या आम्रपाली, नटराज आणि अँटिक पॅलेस डान्सबारचे स्टिंग ऑपरेशन प्रसार माध्यमांनी प्रसारीत केले. त्यावर प्रविण दरेकर दरेकर यांनी ही प्रतिक्रिया दिली.
प्रविण दरेकर म्हणाले, “कोरोनामुळे अनेक गोष्टींवर बंधने घालण्यात आली आहेत. माणसाला जगण्यासाठी लागणाऱ्या सेवा आणि उद्योगांवर बंधने आली आहेत. असे असताना दुसरीकडे डान्सबारवर बंदी असतानाही ते राजरोसपणे सुरू आहेत. गृहमंत्री यांनी तात्काळ या प्रकरणी कारवाई केली असली तरी तात्पुरती आणि तुटपुंजी कारवाई केली गेली आहे.” गृहमंत्री यांनी पोलीस आयुक्तांना निलंबित केले पाहिजे, अशी मागणी दरेकर यांनी गृहमंत्र्यांकडे केली.
“एखादी घटना घडली की मोठ्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी छोट्या अधिकाऱ्यांचा बळी दिला जातो. बार चालू केल्याप्रकरणी ज्याचा ज्याचा संबध आहे त्यावर कारवाई झालीच पाहिजे. पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी कारवाई करून जे असे कृत्य करतात त्यांना कायमची चपराक बसेल तर पुढे असे कृत्य करताना विचार केला जाईल. त्यासाठी कारवाई करणे गरजेचे आहे,” असे मत दरेकर यांनी व्यक्त केले.
“सरकार कोविडची भिती दाखवत सर्वसामान्यांना निर्बंध घालत आहेत. सामान्यांना गर्दी करू नका, असे ओरडून सांगायचे तर दुसऱ्या बाजूला डान्स बार चालू ठेवून गर्दी करत धिंगाणा घालायचा. धिंगाणा घालण्याकरता परवानगी दिली जाते ही दुर्दैवाची बाब आहे. यावर कडक कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी दरेकर यांनी केली.