मुंबई : “सरकारने मेट्रोच्या कामासाठी मालाड येथील कुरार परिसरातील घरांवर जुलमी पद्धतीने कारवाई केली आहे. सामान्य जनतेवर अशा पद्धतीने केलेल्या मनमानीपणाच्या कारवाईचा आम्ही निषेध करीत आहोत. येथील रहिवाशांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करून त्यांना पर्यायी घरे सरकारने उपलब्ध करून द्यावीत,” अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली. प्रशासनाने मालाड पूर्व येथील दफ्तरी रोड कुरार हायवे, हवा हिरा महल येथील मेट्रोच्या कामासाठी मालाड येथील कुरार परिसरातील घरांवर सकाळी कारवाई केली. त्यानंतर विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी तातडीने घटनस्थळी भेट दिली. यावेळी ते बोलत होते (Pravin Darekar criticize MVA government over Malad metro work).
ऐन पावसाळ्यात सुरू करण्यात आलेल्या या कारवाईला विरोध करणारे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांना पोलिसांना ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांना आमदार भातखळकर यांना आरे पोलीस ठाण्यात नेले. दरेकर यांनी आरे पोलीस ठाण्यात जाऊन आमदार भातखळकर यांची भेट घेतली. यासंदर्भात बोलताना दरेकर म्हणाले, “जे प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांच्या कालावधीत मूर्त स्वरूप घेतलेले होते व अंतिम टप्प्यात आले त्यांचे लवकरात लवकर आपल्या हातून उदघाटन व्हावे असे महाविकास आघाडी सरकारला वाटते. त्या प्रकल्पांचे उदघाटन करण्यासाठी साम, दाम, दंड वापरून अशा प्रकारची कारवाई होत आहे. ते अत्यंत चुकीचे आहे.”
मालाड पूर्व येथील दफ्तरी रोड कुरार हायवे, हवा हिरा महल येथील मेट्रोच्या कामासाठी मालाड येथील कुरार परिसरातील घरांवर सकाळीच कारवाई करण्यात आली. त्या ठिकाणी आज भेट दिली. समन्वयाचा अभाव असल्याने कुरार घरांवर कारवाई करण्यात आली असून, अशा जुलमी पद्धतीने पाडकाम करणं योग्य नाही! pic.twitter.com/xrjakGpi5c
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 17, 2021
“मेट्रोच्या विकासासाठी किंवा कोणत्याही प्रकल्पाच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा असतो. परंतु पावसाळा असल्यामुळे मानवतावादी दृष्टिकोन ठेवला पाहिजे. कारण पाडकाम केले तर रहिवाशांना पर्यायी व्यवस्था करून द्यायला पाहिजे. परंतु या ठिकाणी जुलमी पद्धतीने कारवाई केली गेली आणि अशी पाडकाम कारवाई करणे योग्य नाही. लोकशाहीमध्ये जनतेला न्याय मागण्याचा अधिकार आहे. रहिवाशांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे हे महत्वाचे होते. परंतु समन्वयाचा अभाव असल्यामुळे लोकांना भर पावसात बेघर व्हावे लागले. प्रकल्पबाधितांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत,” असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
Pravin Darekar criticize MVA government over Malad metro work